गोळवण शाळेच्या डिजिटल सेवेचे उद्घाटन
By admin | Published: March 28, 2016 08:48 PM2016-03-28T20:48:19+5:302016-03-28T23:58:10+5:30
जिल्हा परिषद शाळा : लोकवर्गणीतून विज्ञान प्रयोगशाळा, कलादालन
बागायत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे गोळवण गावातील ग्रामस्थांकडून सुसज्ज व परिपूर्ण असे कलादालन, डिजिटल रुम व विज्ञान प्रयोगशाळा लोकवर्गणी जमा करून बांधण्यात आली. या सेवेचे उद्घाटन मालवणचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी केंद्रप्रमुख भारती बेटे, सरपंच प्रज्ञा चव्हाण, उपसरपंच सुभाष लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, विजय चव्हाण, आनंदव्हाळचे सरपंच रवींद्र टेंबुलकर, कुणकावळेचे माजी सरपंच आनंद वराडकर, माजी शिक्षक अरुण गोसावी, मालवण तालुका शिक्षक संघटनेचे सचिव संतोष कोचरेकर, गोळवणचे पोलिसपाटील मोहन पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष भाई चिरमुले, सदस्य एकनाथ चव्हाण, आंबेरी सरपंच मंगेश कांबळी, साबाजी गावडे, शिक्षक सौरभ पाटकर, अजित गायकवाड, संजय परुळेकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी आपल्या काळातील शाळा व आताची शाळा पाहिली की आनंदाने डोळे भरून येतात, असे गौरवोद्गार काढले.
मालवण तालुका विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनीही या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळण्याकरिता आपण लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, असे सांगितले.
दत्तात्रय मुळीक म्हणाले की, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षकवृंदाच्या कष्टानेच हे सर्व शक्य झाले. ही शाळा गोळवणपुरतीच नाही तर तालुका व जिल्ह्यातही कलादालन असलेली शाळा आहे. मालवण तालुका अशा शाळांमुळे आघाडीवर असल्याचे स्पष्ट केले. धनाजी चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)