वैभववाडीत खुले, दोडामार्गात ओबीसी
By admin | Published: November 9, 2015 11:13 PM2015-11-09T23:13:44+5:302015-11-09T23:19:53+5:30
नगराध्यक्ष आरक्षण सोडत : काँग्रेसचा मार्ग मोकळा
वैभववाडी, दोडामार्ग : नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर झाले असून, वैभववाडीसाठी खुले, तर दोडामार्गात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे दोडामार्गात युतीचा, तर वैभववाडीत कॉँग्रेसचा नगराध्यक्षपद बसणार असल्याचे स्पष्ट झाले. अनुसूचित जागेसाठी आरक्षण न पडल्याने वैभववाडीत कॉँग्रेसचा जीव भांड्यात पडला. दोडामार्गात युतीचा नगराध्यक्ष बसणार असला तरी सेना-भाजपच्या समान जागा असल्याने रस्सीखेच होणार आहे. कसई-दोडामार्गची नगरपंचायत युतीच्या ताब्यात आहे. सेना-भाजप या दोन्ही मित्रपक्षांना आपापला नगराध्यक्ष बसविण्याची समान संधी आहे. तूर्तास तरी सेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संध्या प्रसादी, तर भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा कोरगावकर व सुधीर पनवेलकर हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण काँगे्रसमार्फत आमचाच नगराध्यक्ष होणार असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसकडे नगराध्यक्षपदासाठी प्रभाग पाचमधून निवडून आलेले संजय चव्हाण आणि ग्रामविकास आघाडीतर्फे बिनविरोध निवडून येऊन नुकतेच काँग्रेसवासी झालेले रवींद्र रावराणे हे दोघेही प्रबळ दावेदार आहेत. स्पष्ट बहुमत असूनही अनुसूचित जातीचा नगरसेवक नसल्याने काँग्रेसला नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची धास्ती होती. वैभववाडीचे नगराध्यक्षपद खुले झाल्याचे कळताच सुटकेचा श्वास टाकत काँग्रेसने आमदार कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेसने प्रभाग पाच खुला असताना संजय चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि ते सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले. त्यामुळे चव्हाण हे पहिल्या नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. तर रवींद्र रावराणे यांनी पाठिंबा दिल्यानंतर बहुमतासाठी कमी पडणारा एक नगरसेवकही काँग्रेसला मिळवून दिला. त्यामुळे रावराणे यांचा नगराध्यक्षपदावर दावा आहे. यातून आमदार नीतेश राणे कोणाची वर्णी लावतात याची वैभववाडीवासीयांना उत्सुकता लागली आहे.कुडाळात ‘खुले’कुडाळ नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्षपद हे खुल्या सर्वसाधारण प्रवर्गातील असल्याचे निवडणुकीपूर्वी जाहीर झाल्याने कुडाळात खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची भाऊबंदी वाढणार, हे निश्चित असून, विविध राजकीय पक्षांना देखील यामुळे नाराजांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे.