‘भुयारी’च्या मुद्यावरून विरोधकांचा सभात्याग
By admin | Published: June 20, 2014 12:13 AM2014-06-20T00:13:33+5:302014-06-20T00:14:16+5:30
मुख्याधिकारी अनुपस्थित : कणकवली नगरपंचायतीच्या सभेत गदारोळ
कणकवली : भुयारी गटार योजनेसारख्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकल्पाबाबत तांत्रिक चर्चा करताना तसेच डीपीआरसंबंधी निर्णय घेताना मुख्याधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. या योजनेच्या डीपीआरसंबंधी निर्णय घेण्यापूर्वी जनतेलाही विश्वासात घेण्यात यावे, अन्यथा वेंगुर्ले तसेच मालवण येथे झालेल्या विरोधाप्रमाणे येथेही तो होईल, असे मत विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मांडले. मात्र डीपीआरसंबंधीचा निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची आवश्यकता नाही. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी विनाकारण विलंब नको, असे सांगत सभा पुढे सुरू ठेवल्याने संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. दरम्यान, भुयारी गटार योजनेच्या मुद्यावरून गुरूवारी झालेली सर्वसाधारण सभा गाजली. काहीकाळ या मुद्यावरून सभागृहात गदारोळही झाला.
येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी संतोष वारूळे, नगरसेवक बंडु हर्णे, नंदिता धुमाळे अनुपस्थित होते.
या सभेत प्रामुख्याने भुयारी गटार योजनेच्या डीपीआरसंबंधीचा मुद्दा चर्चेत आला. याबाबत निर्णय घेण्यापूर्वी वेंगुर्ले, मालवण येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊन सांगोपांग चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांनी मांडले. तर तांत्रिक चर्चा करताना प्रशासनाचे प्रमुख असलेले मुख्याधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यांच्या अनुपस्थितीत डीपीआरसंबंधीचा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नये, असे मत राजश्री धुमाळे यांनी मांडले. मात्र हा निर्णय मुख्याधिकाऱ्यांसाठी थांबविण्याची गरज नाही, असे नगरसेविका मेघा गांगण यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मत मांडले. तर जनतेला विश्वासात घेऊनच भुयारी गटार योजनेबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच या योजनेसाठी शहरातील नागरिकांच्या जमिनी संपादीत कराव्या लागणार नाहीत, असे नगराध्यक्षांनी सांगितले. यानंतर भुयारी गटार योजनेच्या वाढीव डीपीआरसाठी मंजुरी देण्याचा निर्णय सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला. तसेच सभा पुढे सुरू ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारी मनमानी करून निर्णय घेत असतील तर आमचा त्याला विरोध राहणार असे सांगत सभात्याग केला.
पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर शहरात करावयाची कामे, श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठीचे नियोजन, क्रीडा संकुलाबाबतचा निर्णय आदी विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकाजवळील ड्रेनेज पाईपलाईनसाठी रेल्वेने नाहरकत दाखला देण्याचे मान्य केले असून डिपॉझिट म्हणून ३३ लाख रूपये नगरपंचायतीला भरायला सांगितले आहेत.
याबाबत त्या परिसरातील बिल्डर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक बिल्डर्स अनुपस्थित होते. नागरिकांच्या हितासाठी हा निधी भरून काम कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी सभागृहाला दिली. (वार्ताहर)