विरोधकांना विकास म्हणजे काय हेच माहित नाही
By admin | Published: October 2, 2014 10:15 PM2014-10-02T22:15:04+5:302014-10-02T22:24:51+5:30
नारायण राणे यांचा आरोप : कसाल येथे काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
ओरोस : मला कुणीही स्पर्धक नाही. विरोधकांमध्ये ती कुवत नाही. त्यांना विकास म्हणजे काय माहित नाही, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कसाल येथील प्रचार सभेत केली.
कसाल बाजारपेठ येथे काँग्रेसची प्रचारसभा व विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन पाटबंधारे मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद सभापती अस्मिता बांदेकर, कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, संजय पडते, राजन परब, कसाल विभागप्रमुख सुभाष दळवी, बापू पाताडे, व्हिक्टर फर्नांडिस, सचिन कदम, सरपंच नीलेश कामतेकर, उपसरपंच सुलभा परब व इतर उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले की, मी मत मागायला आलो नाही. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. कोकणी जनतेच्या आशीर्वादाने सर्व पदे मिळाली. कोकण एकेकाळी मनिआॅर्डरवर चालायचा. आता आर्थिक प्रगती झाली आहे. शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि आता पडवे गावात मेडिकल कॉलेज होत आहे. जानेवारी महिन्यात चिपी येथे विमान उतरेल. विमान चालविणारे पायलट सिंधुदुर्गात तयार होतील. दहावी, बारावी उत्तीर्ण झालात की शिपाई पदासाठी नोकरीच्या मागे लागता. मोठे अधिकारी व्हा. विकास विरोधकांना जमेल का? असा प्रश्नही राणे यांनी यावेळी उपस्थित केला. आपण शिक्षण कमी असलेल्या विनायक राऊत यांना निवडून दिलेत. त्यांना विकास म्हणजे कळतो का? प्रकल्प कसे आणायचे ते माहित आहे का? दोडामार्ग येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प मंजूर केला आहे. तो पूर्ण होईल असेही राणे म्हणाले.
यावेळी संदेश पारकर, अस्मिता बांदेकर यांनी विचार व्यक्त केले. संतोष कदम यांनी आभार मानले. यावेळी कसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)