विकासात विरोधकांनी राजकारण करू नये
By admin | Published: January 9, 2016 11:59 PM2016-01-09T23:59:53+5:302016-01-09T23:59:53+5:30
दीपक सावंत : साथीत बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचा प्रयत्न
सिंधुुदुर्गनगरी : सिंंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोची साथ नियंत्रणात आणण्यात व रुग्णांचे दवाखान्यात जाण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यात शासनाला यश मिळाले आहे. भविष्यात ही साथ येणार नाही यासाठी यंत्रणा आधीच सज्ज करून ठेवली आहे. विविध आजारांच्या साथीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयातील सदस्याला नोकरी देण्याचा देखील प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विरोधकांना निव्वळ राजकारण न करता जिल्ह्याच्या विकासाच्या कामात खीळ घालू नये, असे आवाहनही केले.
डॉ. सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या १५ वर्षांत खिळखिळी झाली असून मी आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात ही यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे, पण माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी आहे. सिंधुदुर्गात डॉक्टर आणण्याचा आणि तो टिकवण्याचा फॉर्म्युला विरोधकांनी द्यावा. आम्ही तो नक्की अंमलात आणू, असे आवाहन दीपक सावंत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत सतत गळा काढणाऱ्यांनी आणि निराधार आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेत आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, विरोधकांच्या हातात वर्षानुवर्षे सत्ता असतानाही ते का गप्प होते? सत्तेची १५ वर्षे ज्यांनी कास धरली होती तेव्हा आतासारखीच सक्षम आरोग्य यंत्रणा होती का? गेल्या १५ वर्षांत सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था खिळखिळीच झाली आहे. तेव्हा विरोधकांनी का नाही गळे काढले? विरोधकांना गेली १५ वर्षे या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यास मोेठा वाव होता. परंतु त्यांनी काही केले नाही.
माझ्याकडे आरोग्य मंत्रिपद येऊन केवळ एक वर्ष झाले. या कारकिर्दीत सुमारे १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. डॉक्टरांना आणण्यात यश मिळत आहे. रुग्णालयांना बळकटी आणण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला. जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांची संख्या ३० वरून ५१ करण्यात आली. उपकेंद्रे बांधण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्थायी डॉक्टरांची नेमणूक करण्यात परवानगी दिली असून भरती प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
सीपीएस कोर्स मंजुरी
सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय येथे एम.बी.बी.एस.नंतरचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सीपीएस अभ्यास कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ, डिप्लोमा इन गायनोकॉलॉजी एन्यु आॅबस्टेटिक्स, डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ, डिप्लोमा इन पॅथॉलॉजी एन्ड बॅक्टेरीआॅलॉजी हे वैद्यकीय अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत.