नामुष्की टाळण्यासाठी अपक्षाला संधी
By admin | Published: November 23, 2015 11:38 PM2015-11-23T23:38:58+5:302015-11-24T00:29:10+5:30
वैभववाडी नगरविकास आघाडी : काँग्रेसने पक्षाच्या उमेदवाराला डावलल्याचा आरोप
वैभववाडी : काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होणार नाही याची खात्री झाल्यामुळेच नामुष्की टाळण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी आम्ही निवडणूकीपुर्वी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. वैभववाडीचा पहिला नगराध्यक्ष ग्रामविकास आघाडीचा होतोय याचे आम्हाला समाधान आहे. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर पाच वर्षात पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकाला काँग्रेसने नगराध्यक्ष करुन दाखवावे, असे आव्हान भाजप शिवसेना पुरस्कृत वैभववाडी नगरविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
नगरविकास आघाडीच्या गटनेत्या सरिता सज्जनराव रावराणे यांच्या निवासस्थानी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सज्जनराव रावराणे, रणजित तावडे, तसेच नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, संतोष पवार, रवींद्र तांबे, राजन तांबे, रत्नाकर कदम, सरपंच प्रकाश रावराणे, विवेक रावराणे आदी उपस्थित होते. प्रमोद रावराणे म्हणाले, भाजप, शिवसेना व आरपीआय महायुतीने नगरपंचायतीच्या नेतृत्वाची ग्रामविकास आघाडीकडेच दिली जाईल, असा शब्द वाभवेच्या ग्रामस्थांना दिला होता. त्याप्रमाणे आम्ही बिनविरोध निवड जाहीर होताच रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
परंतु रावराणे यांनी गावाचा विश्वासघात तरीही ते अपक्ष नगराध्यक्ष होणार असल्याचे आम्हाला समाधान आहे. नारायण राणे बोलतात ते करतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे. परंतु आपल्या मुलाच्याही प्रचाराची सभा न घेता राणे यांनी वैभववाडीत १४ जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, बँकेची सर्व सत्ता वापरूनही आणि आमदार नीतेश राणे यांनी दोन महिने वैभववाडीत ठाण मांडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवूनसुद्धा केवळ सातच जागा काँग्रेसला जिंकता आल्या. त्यामुळे पक्षाचा नगराध्यक्ष बसणार नाही. हे लक्षात आल्यावर आमदार राणे यांनी नामुष्की टाळण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलून ग्रामविकास आघाडीच्या अपक्ष रविंद्र रावराणे यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. मात्र, चुकीचे काहीच होऊ देणार नाही.
जयेंद्र रावराणे म्हणाले, रवींद्र रावराणे हे ग्रामविकास आघाडीचे नगरसेवक आहेत. तरीही त्यांनी ग्रामस्थांचा विश्वासघात केल्यामुळेच आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परंतु काँग्रेसला आमच्या भितीपोटी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना डावलावे लागले हाच आमचा विजय आहे. आम्ही नगरपंचायती कोणतीच निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. येत्या पाच वर्षात काँग्रेसची अवस्था काय असेल तेही सर्वांना दिसेल. (प्रतिनिधी)
कुटनीतीचे पद औटघटकेचे : रावराणे
वैभववाडीच्या जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. काँग्रेसची दादागिरी मोडीत काढली. त्यामुळेच आम्ही आमच्या प्रयत्नातून बिनविरोध निवडून आणलेल्या रवींद्र रावराणे यांना नगराध्यक्ष पदासाठी आपल्या जाळ्यात ओढले. काँग्रेसने कुटनीतीचे राजकारण करुन मिळवलेले नगराध्यक्षपद औटघटकेचे ठरणार असून नगराध्यक्ष पद मिळविल्याचा काँग्रेसचा उत्साह फार काळ टिकणार नाही, अतुल रावराणे यांनी स्पष्ट केले.