७४ वर्षात क्रियाशील नेत्यांनाच कुडाळवासीयांकडून संधी
By admin | Published: March 24, 2016 11:26 PM2016-03-24T23:26:29+5:302016-03-24T23:38:26+5:30
नगरपंचायत निवडणूक : जागृत लोकशाहीचा इतिहास, पक्ष वर्चस्वाला मतदारांची कायमच बगल--कुडाळ गावाकडून नगराकडे
कुडाळ तसे पाहिल्यास जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. वैभववाडी आणि दोडामार्ग पाठोपाठ आता कुडाळचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. येत्या १७ एप्रिलला नगरपंचायतची पहिली निवडणूक होत आहे. वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणापेक्षा कुडाळ शहर फारच मोठे आहे. त्यामुळे कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर अगोदरच होणे आवश्यक होते. कारण सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ले पाठोपाठ कुडाळचा क्रमांक लागतो. महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कुडाळ शहरात नगरपंचायत निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘कुडाळ गावाकडून नगराकडे’ या मालिकेतून कुडाळ शहरावर टाकलेला प्रकाशझोत आजपासून.....
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळलाच सर्वमान्य पसंती मिळाली. त्यामुळे प्रशासनाची सर्वप्रमुख कार्यालये कुडाळ शहरात प्रस्थापित झाली. साहजीकच जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या विकासात्मक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या या कुडाळ शहराचे राजकारणही तेवढेच कौतुकास्पद असेच मानले जाते. ग्रामपंचायतीच्या ७४ वर्षाच्या इतिहासात कुडाळवासीयांनी क्रियाशिल नेत्यांनाच संधी दिली आहे. राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेचा विचारही केला जात नाही केवळ आमच्यासाठी जो जागतो त्यालाच आम्ही संधी देतो, अशीच जागृत लोकशाहीची व्याख्या कुडाळवासीयांनी दाखवून दिली आहे.
कुडाळ ग्रामपंचायत सन १९४२ साली स्थापन झाली. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून कुडाळ शहर ग्रामपंचायतीचे १८ सरपंच येऊन गेले. यामध्ये मंगेश नाडकर्णी (१९४२-१९४३), धोंडदेव नाडकर्णी (१९४३-१९४६), मंगेश नाडकर्णी (१९४६-१९४८), धोंडदेव नाडकर्णी (१९४८-१९५२), पद्मनाभ घुर्ये (१९५२-१९५६), विठ्ठल भोगटे (१९५६-१९६१, १९६६-१९६९), वासुदेव भाट (१९६९-१९७४), मोहन बांदेकर (१९७४-१९७४), तुकाराम शिरसाट (१९७४-१९८०), रामनाथ भोगटे (१९८०-१९८३), अरविंद शिरसाट (१९८३-१९९२), नागेश शिरसाट (१९९२-१९९८), सुधा शारबिद्रे (१९९८-२००२), समता परब (२००२-२००६), कल्पना साळुंखे (२००६-२००७), आशा आळवेकर (२००७-२०१०), प्रशांत राणे (२०१०-२०१२), स्रेहल पडते (२०१२-२०१६) या मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सांभाळत कृडाळच्या विकासाला चालना देण्याचे कार्य केले आहे.
कुडाळ ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत भारतावर ब्रिटीश अंमल होता. त्यामुळे स्थापनेनंतर सुरूवातीलाच विकासात्मक कारभारापेक्षा सामूहीक एकता निर्माण करून ती एकसंघपणे टिकविण्याचा मुख्य प्रश्न होता, आणि त्यावरच मुख्य भर दिला गेला. स्वातंत्र्यानंतर कुडाळच्या विकासाला सुरूवात झाली आणि अन्न, वस्त्र, निवारा या गरजांच्या पूर्तता करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटन बांधण्यात आले. सुरुवातीला त्यावेळी प्रस्थापित काँग्रेसचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर राहीले, त्यानंतर जनता दलाचा अंमल मोठ्या प्रमाणात इथे सुरू झाला. १९८५ पासून मात्र कुडाळ ग्रामपंचायतीवर व्यक्तीगत नेतृत्वाचे पडसाद उमटत गेले आणि जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणाचा इथे मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होऊ लागला. शिवसेना, काँग्रेस अशी परस्पर विरोधातील लढत इथे रंगतदार होत राहीली. पण या सर्वाचा विचार करता कुडाळवासीयांच्या राजकारणाची लकब मात्र जिल्ह्यात टिकून राहीली ती केवळ आणि सजग लोकशाहीच्या उदाहरणातून इथे काम करणाऱ्यांना संधी दिली गेली आणि केवळ बोलघेवड्या गप्पा मारणाऱ्यांना येथील जनतेने लटकतच ठेवले आहे. कुडाळ शहरात कुणा एका पक्षाचे वर्चस्व कधीच अबाधित राहीले नाही. कुडाळ शहरातील विकासाचा विचार केला तर येथील ग्रामपंचायतीकडून शहरातील गटारे, नळपाणी योजना, पथदीप, कचरा व्यवस्थापन अशा प्रकारची जास्तीत जास्त व जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची विकासकामे करण्यात आलेली होती. यामध्ये संधी मिळेल त्या सरपंच उपसरपंचांनी आपली मोलीची भर टाकली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इतिहासातून कुडाळ शहराची करण्यात आलेली पायाभरणी कधीच डावलता येणार नाही. ग्रामपंचायतीने शहराचे मंदिर बांधले आहे. आता नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या माध्यमातून हे मंदिर सजविण्याचे काम होणार आहे.