वाळू पट्ट्यांच्या लिलावाला विरोध, भाग संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:59 PM2020-11-10T14:59:26+5:302020-11-10T15:01:08+5:30
malvan, sand, chipi, sindhudurgnews कर्ली खाडीपात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला मालवण तालुक्यातील आंबेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग : कर्ली खाडीपात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला मालवण तालुक्यातील आंबेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या ठिकाणी निसर्गनिर्मित बेटे, खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत मत्स्यपालन शेती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी कर्तव्यतत्पर महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल न मागविता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वाळू उपसा करण्यास परवानगी देऊ नये. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडू, असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच त्यांचे लिलाव होणार आहेत. यात कर्ली खाडीतील वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्ली खाडीतील वाळूपट्ट्यांचा लिलाव करताना गट डी आणि ई मधील वाळू लिलाव करण्यास मालवण तालुक्यातील वाघवणे देवली, आंबेरी वाकवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्रामस्थ किशोर वाक्कर, वीरेश मांजरेकर, मनोज वाक्कर, निलेश मांजरेकर, सदानंद गोरे, दीपक चव्हाण, राजीव नाईक आदी उपस्थित होते.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून दिखावू कारवाई
कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर महसूलच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी केवळ बंद असलेल्या रॅम्पवर कारवाई केली. तसेच काही ठिकाणी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दिखावू कारवाई केली. मात्र, रॅम्प पुन्हा कार्यरत झाले आहेत. याकडे दुर्लक्ष केला जात आहे. याबाबत या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. वाळू पट्ट्यांचे लिलाव करताना नजीकच्या ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचा विचार होणे आवश्यक आहे. यात प्रशासनाने घिसाडघाई करून चालणार नाही.
बंधारे, बेटे धोक्यात
सागरी महामार्गावरील पुलाजवळ कर्ली खाडीतील गट डी आणि ई अंतर्गत येणाऱ्या उपगटात निसर्गनिर्मित बेटे आहेत. खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत सुरू असलेली मस्त्यपालन शेती यात येत आहे. या ठिकाणच्या वाळूचा लिलाव झाल्यास निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे आणि मत्स्य शेतीला ते घातक ठरणार आहे.