विरोधकांच्या आरोपांना ३० डिसेंबर नंतर उत्तर देणार!, आमदार नितेश राणेंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:58 PM2021-12-22T17:58:11+5:302021-12-22T18:00:12+5:30
जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची केली घोषणा.
कणकवली : आम्हाला आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आचारसंहिता घालून दिली आहे. त्यामुळे विरोधकांच्या राजकीय आरोपांची उत्तरे ३० डिसेंबरनंतर त्याच ताकदीने दिली जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला. यावेळी त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. कणकवली येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले, जिल्हा बँकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होईल. देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत, त्याचा फायदा बँकेला व नागरिकांना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हा बँकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हीच परमनंट करू शकतो.
सहकार क्षेत्रातील ही निवडणूक आहे, कठलेही राजकारण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत नाही. सहकार रुजला पाहिजे, त्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. कुणीही कितीही टीका टिप्पणी केली तरी आम्ही बोलणार नाही. सिद्धिविनायक सहकार पॅनेलचे प्रमुख राजन तेली असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजन तेली म्हणाले, जिल्हा बँकेची प्रगती झाली, विकासाची कामे, व्यवहार वाढला हे यश राणेंमुळे मिळाले आहे. त्यामुळे १९ ही जागा आम्ही जिंकणार आहोत. आता ९८१ मतदार आहेत, घाणेरडे राजकारण सतीश सावंत यांनी केले, खात्यात पैसे असतानाही संबधित संस्था बाद केल्या आहेत,अशीही टीका त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख राजन तेली, बँक उमेदवार अतुल काळसेकर, महेश सारंग, मनीष दळवी, प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, आदी भाजपा पुरस्कृत जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते.