सिंधुदुर्गात विरोधी पक्ष भरकटलेले
By admin | Published: October 26, 2015 11:18 PM2015-10-26T23:18:48+5:302015-10-27T00:16:27+5:30
विनायक राऊत : केसरकरांवरील आरोपांचा घेतला समाचार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे. त्यांच्यातले चांगले विचार संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या वैचारिक पातळीची कीव करावीशी वाटते. त्यामुळेच ते पालकमंत्र्यांच्या विरोधात बडबड करत असल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी हाणला.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजू नाईक, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शब्बीर मणियार, स्नेहा तेंडोलकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, अशोक दळवी, शिवप्रसाद कोळंबेकर उपस्थित होते.यावेळी शिवसेना-भाजप सत्तेमध्ये ठरलेल्या अधिकारांमध्ये काम करत आहेत. प्रत्येकाकडे खाती दिलेली आहेत. त्याप्रमाणे शिवसेना व भाजप दोन्ही एकत्रित काम करत असून, कोणताही मतभेद नसल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी पंचायत समितीकडे आपले बारीक लक्ष असून, न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्य ती भूमिका घेऊ, असे सांगितले. आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, असेही यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले. सावंतवाडी टर्मिनसचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल व याठिकाणी जास्तीतजास्त रेल्वेगाड्यांना थांबा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे राऊत म्हणाले. रेल्वे दुपदरीकरणाचा शुभारंभ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोह्यापासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जास्त खाती असल्याने ते वेळ देऊ शकत नसल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (वार्ताहर)