नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी रचलाय बनाव: राजेंद्र राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 08:20 PM2017-10-08T20:20:04+5:302017-10-08T20:20:15+5:30
वैभववाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे.
वैभववाडी(सिंधुदुर्ग ): तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे. प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळाले नसल्याने विरोधकांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली असून काहींच्या अपत्यांची खोटी शपथपत्रे दाखल केली आहेत, असा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 125 सदस्यांपैकी 8 जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित 117 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीनंतर तब्बल 75 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बिनविरोध सदस्यांच्या संख्येवरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा दावा राणे समर्थक पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांनी माध्यमांकडे केला होता. त्यांचा दावा खोडून काढताना समर्थ विकास पॅनेलचे 25 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट करीत 'समर्थ'पेक्षा भाजपाचे 2 सदस्य अधिक असल्यानचे राणे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
पत्रकात राजेंद्र राणे यांनी पुढे म्हटले आहे की, काही गावात भाजपाने ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रामविकास आघाडीचे 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बिनविरोध 75 सदस्यांपैकी 59 समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा विरोधकांचा दावा म्हणजे आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी रचलेला निव्वळ बनाव आहे. तसेच सरपंचपदासाठी 10 गावांत भाजपाचे उमेदवार असून 6 ठिकाणी ग्रामविकास आघाडीला भाजपाचा उघड पाठिंबा आहे.
आता निवडणूक लागलेल्या 17 पैकी 15 ग्रामपंचायतींवर अनेक वर्षे विरोधकांकडे तर केवळ 2 ग्रामपंचायती भाजप-शिवसेनेकडे होत्या. त्यामुळे आम्ही सर्व गावात ताकदीने उभे राहत पॅनेल केली हेच आमचे यश आहे. गावातील लोकांना आपला सरपंच थेट निवडून देण्याचा अधिकार भाजपनेच जनतेला दिला आहे. त्यामुळे जनता भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
हा 'त्यांचा' नैतिक पराभव
अनेक वर्षे ग्रामपंचायतीची सत्ता असणा-यांपेक्षा भाजपचे बिनविरोध सदस्य अधिक आहेत. तर हा त्यांचा नैतिक पराभव आहे, अशी टीका करीत ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच उंबर्डे मेहबूबनगर येथून ज्युलेखा नासीर सारंग यांना आणि कोळपे येथून नजिया साजिद पाटणकर यांच्या रुपाने मुस्लिम समाजाचे सदस्य भाजपाने बिनविरोध निवडून आणले आहेत. तर नावळेत बिनविरोध निवडून आलेल्या 6 पैकी 4 सदस्य भाजपाचे आहेत. सडुरेतील 7 पैकी 5, निमअरुळेत 5 व जांभवडेत 6 पैकी 3 सदस्य भाजपाचे आहेत. अरुळे गावातील सरपंचपदाचे तिन्ही उमेदवार भाजपा-शिवसेना विचाराचे आहेत,असा दावा राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.