न्यायालयाचा आदेश धाब्यावर
By admin | Published: April 24, 2016 11:20 PM2016-04-24T23:20:06+5:302016-04-24T23:20:40+5:30
दोडामार्ग तालुक्यातील ‘क्वॉरी’ व्यावसायिकांकडून प्रकार : दंड भरत नसल्याचीही तहसीलदारांची माहिती
कसई-दोडामार्ग : गौण खनिज उत्खननास न्यायालयाचे बंदीचे आदेश असतानाही दोडामार्ग तालुक्यात काळ्या दगडाच्या क्वॉरी सुरू आहेत. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत क्वारी मालक जुमानत नाहीत. ही बाब जिल्हाधिकारांच्या निदर्शनास आणून देत पोलीस बंदोबस्तात येत्या आठ दिवसात कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार पी. जी. केरकर यांनी देत ज्या क्वॉरीमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, ती दंडात्मक रक्कमही त्यांनी भरली नसल्याचे केरकर यांनी सांगितले.
इकोसेन्सिटिव्ह झोनखाली तालुक्यातील बारा गावचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात गौण खनिज उत्खननास न्यायालयाने बंदीचे आदेश फर्मावले. मात्र दोडामार्ग तालुक्यात गौण खनिज उत्खननास परवानगी नसतानाही हे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरूच होते. तत्कालिन तहसीलदार संतोष जाधव हे कार्यरत असताना त्यांच्या कार्यकालात हे गौण खनिज उत्खनन सुरू होते.
याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, जनतेने हे बेकायदा गौण खनिज उत्खनन ताबडतोब बंद करावे, अशी मागणी करून देखील तत्कालिन तहसीलदार संतोष जाधव यांनी कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई संबंधित व्यावसायिकांवर न करता हे गौण खनिज उत्खनन बंद करू शकले नाहीत.
न्यायालयाचे आदेश असतानाही तहसीलदार जाधव यांच्या आशिर्वादाने हे गौण खनिज उत्खनन सुरूच राहीले.
तत्कालीन तहसीलदार संतोष जाधव यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार पदाचा कारभार पी. जी. केरकर यांनी हाती घेताच तालुक्यात सुरू असलेले गौण खनिज उत्खनन म्हणजे काळ्या दगडाच्या क्वॉरी, जांभ्या दगडाच्या चिरेखाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश न्यायालयाच्या आदेशानुसार फर्मावले. त्यामुळे सर्व क्वॉरी व चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यात गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना व जमीन मालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशा नोटीसा तहसीलदार पी. जी. केरकर यांनी काढताच तालुक्यातील सर्व क्वॉरी व चिरेखाण मालक एकत्र आले आहेत.
न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवून क्वॉरी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आपले व्यवसाय सुरूच ठेवले आहेत. तालुक्यातील शैलेश दळवी, अल्कॉन, नानो कंपनी या तिघांनाच परवानगी आहे. अन्य ठिकाणी वझरे, तळेखोल, मांगेली, तिलारी बुडीतक्षेत्रात सुरू असलेल्या या क्वॉरींना कोणत्याही प्रकारची परवानगी नाही.
गौण खनिज उत्खननास न्यायालयाचा बंदीचा आदेश असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात देणार आहे.
कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करणार आहे. येत्या आठ दिवसात विनापरवाना सुरू असलेल्या क्वॉरीवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती तहसीलदार पी. जी. केरकर यांनी दिली. (वार्ताहर)
तहसीलदार : कारवाईसाठी गेल्यास कामगार पळतात
याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणताही निर्णय अद्याप झाला नसतानाही दोडामार्ग तालुक्यात गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काळया दगडाचे उत्खनन करण्यासाठी सुरूंग स्फोट करण्यात येतात. याबाबत तहसीलदार पी. जी. केरकर यांना विचारणा केली असता क्वारी व चिरेखाण व्यावसायिक बंदीचे आदेश असतानाही हे व्यावसायिक जुमानत नाहीत. उत्खनन सुरू असलेल्या क्वारीवर कारवाईसाठी गेलो असता तेथे काम करणारे कामगार पळून गेले. बऱ्याच विनापरवाना सुरू असलेल्या क्वारी मालक व जमीन मालकांवर दंडात्मक कारवाई केली ती रक्कमही भरणा करण्यात आली नसल्याचे तहसीलदार पी. जी. केरकर यांनी सांगितले.