सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:12 PM2022-11-28T13:12:02+5:302022-11-28T13:12:36+5:30

एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता या प्रश्नी इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Order to company to collect toll at Osargaon toll booth on Mumbai-Goa highway in Sindhudurga | सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश

सिंधुदुर्गात ओसरगाव येथील टोलवसुलीला प्रारंभ होणार, ठेका घेतलेल्या कंपनीला कार्यारंभ आदेश

googlenewsNext

कणकवली : सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्याकरिता गणेश घरिया कंस्ट्रक्शन, राजस्थान या कंपनीला ठेका काही दिवसापूर्वी मिळाला होता. या कंपनीला कार्यारंभ आदेशही या विभागाच्या कोल्हापूर येथील क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळाला आहे. त्यामुळे टोल वसुलीच्या दृष्टीने हालचालीनी गती घेतली आहे.

येत्या दोन दिवसात जनतेच्या माहितीसाठी याबाबतची नोटीस प्रसिध्द करुन लवकरच टोलवसुलीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सिंधुदुर्गात आता टोलवसुलीला प्रारंभ होणार हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकास कामे होण्याकरिता टोल द्यावा लागणार असल्याची भूमिका प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर आता या प्रश्नी इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुलीसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार कंपनीकडून दिवसाला ७ लाख ५२ हजार ३७८ रुपये टोलवसुली केली जाणार आहे. टोलवसुली प्रत्यक्ष सुरु केल्यापासून तीन महिन्यापर्यंत या ठेकेदार कंपनीचा कालावधी असणार आहे. दिवसाला या कंपनीकडून किती टोलवसुली केली जाते व अन्य बाबींची कितपत पुर्तता केली जाते यावरच रिटेंडर किंवा याच कंपनीला पून्हा ठेका द्यायचा की नाही हे अवलंबून असणार आहे. टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या कंपनीने क्षेत्रीय कार्यालयाकडे अनामत रक्कम भरल्यानंतर या कंपनीला आता रितसर कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

या टोलवसुलीचे दर कुठल्या वाहनांना किती असणार आहेत? याबाबत जनतेला माहिती होण्यासाठी येत्या दोन दिवसात क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर टोलवसुली प्रत्यक्ष सुरु होणार आहे. जिल्हयातील राजकीय पक्षांनी सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना १०० टक्के टोलमाफी देण्याची मागणी करत यापूर्वी आंदोलने केली होती. मात्र टोलनाक्याच्या २० किमी परिघातील वाहनांना ठरवून दिलेले शुल्क आकारून पास दिला जाणार आहे.

मात्र जिल्हयातील इतर वाहनांबाबत यापूर्वी ठरवून देण्यात आलेले दर असणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष टोलवसुली सुरु झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही होणार असल्याने महामार्गावरुन जाणार्‍या- येणार्‍या वाहनचालकांना आता टोलचा भुर्दंड बसणार हे आता निश्चित झाले आहे. तसेच आता कोणत्याही क्षणी सिंधुदुर्गात टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Order to company to collect toll at Osargaon toll booth on Mumbai-Goa highway in Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.