शांतता समितीच्या बैठकीत आदेश, ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवावर बंधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:09 PM2020-08-01T18:09:43+5:302020-08-01T18:18:57+5:30
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवावर कोरोनामुळे बंधने आली आहेत. याबाबत मालवणात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार अजय पाटणे यांनी दिलेल्या आदेशानुसार नारळी पौर्णिमा उत्सव पाच व्यापारी व काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीत साजरा केला जाणार आहे.
मालवण : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवावर कोरोनामुळे बंधने आली आहेत. याबाबत मालवणात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार अजय पाटणे यांनी दिलेल्या आदेशानुसार नारळी पौर्णिमा उत्सव पाच व्यापारी व काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीत साजरा केला जाणार आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सवाद्य मिरवणूक काढता येणार नाही. नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी ३ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथून समुद्रात श्रीफळ सोडल्यानंतर अन्य नागरिकांना समुद्राला श्रीफळ अर्पण करता येणार आहे.
दरम्यान, नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ लढवणे अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा होणार नाहीत. कोणतीही दुकाने मांडली जाणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बंदरजेटीवर गर्दी करू नये. नागरिकांनी ३ वाजल्यानंतर आपल्या जवळच्या समुद्रकिनारी जाऊन समुद्रास श्रीफळ अर्पण करावे, अशा सूचनाही पाटणे यांनी दिल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक पद्धतीने कार्यक्रम करण्यास बंदी आहे. सण उत्सवही साजरे करताना निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सव सार्वजनिक सार्वजनिक पद्धतीने साजरे न करता वैयक्तिक स्तरावर साधेपणाने साजरे करावेत. शासनाच्या नियमांचे पालन करूनच सर्वधर्मियांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी मालवणवासीयांना केले.
आगामी बकरी ईद, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव व मोहरम सणांच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका शांतता समितीची बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण पोलीस ठाणे सभागृहात पार पडली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे, वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर यासह वीज, बस, आरोग्य, बांधकाम व अन्य विभागाचे प्रमुख, पोलीस पाटील वासुदेव गावकर, पांडुरंग चव्हाण तसेच सर्वधर्मीय प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या. दुकानाबाहेर गर्दी झाली म्हणून व्यापारीवर्गाला दंड कारवाई करू नका. दुचाकीवर पती-पत्नी किंवा घरातील अन्य नातेवाईक असतील तर डबलसीट परवानगी द्या. उत्सव काळात बेंजो व अन्य वाद्य वाजविण्यास परवानगी द्या. नियम अटींसह मोहरम मिरवणुकीस परवानगी द्या. किल्ल्यावरून मोहरम आणताना परवानगी द्या. यासह अन्य काही मागण्या करण्यात आल्या.
यावर तहसीलदार यांनी सर्व मागण्या जिल्हाधिकारी स्तरावर पोहोचवल्या जातील. शासन स्तरावरूनही आणखी काही नवे धोरण आल्यास ते तत्काळ कळविले जाईल असे स्पष्ट केले. सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल देऊळवाडा सागरी मार्गावर उभ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दर्जेदार रस्ते बनविणाऱ्या पालिकेचे विशेष कौतुक
मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला केलेले सहकार्य व दाखविलेल्या संयमामुळे शक्य झाले, असे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले. यावर व्यापारी संघाचे नितीन वाळके यांनी कोरोनामुक्त मालवण हे प्रशासनाचेच यश असल्याचे सांगत अभिनंदन ठराव घेतला. तर जॉन नऱ्होना यांनी शहर खड्डेमुक्त करत दर्जेदार रस्ते बनविणाऱ्या पालिकेचे विशेष कौतुक केले.