ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोलधाड सुरू होणार, टोलविरोधी कृती समितीचा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 13, 2023 11:16 AM2023-06-13T11:16:03+5:302023-06-13T11:19:33+5:30
टोलविरोधी कृती समितीची कणकवलीत बैठक: टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाला खेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा टोलविरोधातील कृती समितीने दिला आहे. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान कणकवलीतील एमएच ०७ हॉटेल मध्ये टोलमुक्त कृती समितीची आज १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत रणनिती आखली जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग पासींगच्या वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे. त्याशिवाय टोलवसुली करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. १४ जून पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
- मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९५ रुपये
- मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १५५ रुपये
- ट्रक आणि बस (२ ॲक्सल) : ३२० रुपये व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी : ३५० रुपये
- मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी : ५०५ रुपये.
- सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : ६१५ रुपये.
- अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३३० रुपये मासिक पास शुल्क.