एक हे टोक दुसरं ते टोक
By admin | Published: May 15, 2015 10:09 PM2015-05-15T22:09:53+5:302015-05-15T23:35:03+5:30
कोकण किनारा
र त्नागिरी जिल्ह्यात गतसप्ताहात दोन अगदी टोकाच्या घटना घडल्या. धार्मिक किंवा अध्यात्मिक क्षेत्रातील या दोन घटना लोकांच्या मनात खूप मोठी खळबळ उडवणाऱ्या होत्या, सर्वसामान्यांचं मन ढवळून टाकणाऱ्या होत्या. एका गोष्टीने सकारात्मक खळबळ उडाली आणि दुसऱ्या गोष्टीने नकारात्मक. एक कथा आहे अध्यात्मासाठी केलेल्या त्यागाची आणि दुसरी कथा आहे ती अध्यात्मातून केलेल्या लुटीची. खरं तर तरूण पिढीला कायमच बेजबाबदार म्हणून हिणवलं जातं. पण एका तरूणानं अध्यात्माच्या मार्गाने जाण्यासाठी त्यागाचा नवा पाठ दिला तर वयानं जेष्ठ असलेल्या एका महिलेने अध्यात्माचा आधार घेत भक्तांना फसवण्याचा धडा दिला. अध्यात्माच्या वाटेवर नेमकं होतं काय, अध्यात्मातून मन:शांती मिळते की मोह तिथेही पाठ सोडत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या निर्माण करणाऱ्या घटना म्हणून त्या महत्त्वपूर्ण आहेत.
तसं कुठल्याही भूभागात सतत काही ना काही घटना घडतच असतात. घटना घडत राहतात म्हणूनच समाजगाडं सुरू असतं. पण जेव्हा एकेमकांना छेद देणाऱ्या घटना घडतात, तेव्हा समाजात, सर्वसामान्यांच्या मनात खळबळ उडते. रत्नागिरी जिल्ह्यातही या आठवड्यात अशाच घटना घडल्या आहेत. एक घटना आहे ती अतिशय सकारात्मक. पण तरीही खळबळ उडवणारी. रत्नागिरीतील सिद्धार्थ जैन या २१ वर्षीय तरूणाने दीक्षा घेतली. सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. आता त्या तरूणाचे मुनी तीर्थशेखर विजय झाले आहेत. आजचं जग विशेषत: आजची तरूण पिढी चंगळवादी झाली आहे. घरामध्ये सर्व सुखं उपलब्ध असतानाही सिद्धार्थने (आधीचा सिद्धार्थ आणि आताचे मुनी तीर्थशेखर विजय) पत्करलेला मार्ग खूपसा कौतुकास्पद वाटणारा, काहीसा खळबळ उडवणारा, काहीसा हेवा/मत्सर जागा करणारा. २१व्या वर्षी त्यांना जो मार्ग आपलासा करावासा वाटला, तो अनेकांना वयाच्या साठीलाही स्वीकारणं जमत नाही. म्हणून या मार्गावर जाण्याचे तयांचे धाडस कौतुक करण्यासारखे आहे. सगळी संसारसुखे उपभोगल्यानंतरही त्यातून बाहेर न पडता येणारी अनेक माणसे आसपास असतात. इतकंच काय, मोबाईलमध्ये टॉकटाईम नसला किंवा नेट बंद झालं असलं तरी प्रचंड बैचनी येणारे लोक आसपास दिसत असताना मुनी तीर्थशेखर विजय यांनी सर्वाचा त्याग करण्याची वृत्ती दाखवावी, ही थोडीशी हेवा वाटणारी गोष्ट. केवळ जैन धर्मीयच नाही तर असंख्य हिंदू लोकही सिद्धार्थचा मुनी तीर्थशेखर विजय होण्याचा प्रवास पाहण्यासाठी साक्षीदार म्हणून उपस्थित होते. आपल्याच कुटुंबातील एखादा सदस्य दूर जात असल्याच्या अनुभव घेऊन त्यांचेही डोळे पाणावले. आपल्या मुलाला असं आपल्यापासून दूर पाठवता येईल का, असा विचारही अनेकांच्या मनात येऊन गेला. एकूणच हा सोहळा मनात खळबळ उडवणारा ठरला.
जिल्ह्यात घडलेला दुसरा प्रकार मात्र पूर्ण नकारात्मक. अध्यात्माचा आधार घेत स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा. तोही एका महिलेने केलेला. चिपळूण तालुक्यातील कामथे येथील वासंती कांबळे या महिलेने दूर गेलेल्या आपल्या भक्ताला पुन्हा स्वत:कडे आणण्यासाठी त्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा हा प्रकार तीव्र संताप निर्माण करणारा होता. असंख्य भक्तांना फसवून बरीच माया गोळा करणारी वासंती कांबळे स्वत:ला माऊली म्हणवून घेत होती. प्रकाश बाईत हा तिचा भक्त. माऊलीच्या काही चुकीच्या गोष्टींमध्ये त्याने सहभाग घेतलेला. पण जेव्हा माऊलीचे प्रताप कळू लागले, तेव्हा त्याने तिच्या आसपास जाणे टाळले. त्याला माहिती असलेली आपली बिंगे फुटू नयेत, यासाठी माऊलीने चक्क प्रकाश बाईत याच्या मुलाला सात वर्षीय प्रथमला पळवून नेलं.
अध्यात्माच्या मार्गावर मोह, माया, मत्सर या गोष्टी आपोआपच गळून पडतात. पण माऊलीला मात्र मोह आवरत नव्हता. तिथे उभारलेलं सभागृह, नदीपात्रात बांधलेलं देऊळ अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य माणसांना धक्कादायक ठरल्या आहेत.
लोकांच्या मनावर आपला पगडा उमटावा, यासाठी माऊलीने एका कारागिराकडून दगडात मानवी पाऊल कोरून घेतले. हे पाऊल कलावती आर्इंचे आहे आणि आपल्यामध्ये आर्इंचा अंश आहे, असं सांगून तिथे बस्तान बसवले. अनेक सरकारी अधिकारीही तिच्या अवतीभोवती गोंडा घोळत होते. अध्यात्माच्या बुरख्याआडचे हे रूप अत्यंत घृणास्पद आहे.
अध्यात्मातून मन:शांती मिळते, असं प्रत्येक धर्माने सांगितलंय. पण गेल्या काही काळात अनेक मोठमोठ्या धर्मगुरूंनी केलेली काळीकृत्य जगासमोर आली आहेत. अशावेळी तीर्थशेखर विजय यांनी इतक्या कमी वयात स्वीकारलेला हा त्यागाचा मार्ग फलदायी म्हणजेच मन:शांती देणारा ठरेल का, असा प्रश्नही सहज उभा राहतो. अध्यात्माच्या मार्गावरून गेल्यानंतर मन:शांती मिळण्यापेक्षा जिकडेतिकडे माऊलीच सापडली तर येणारे नैराश्य अधिक असेल.
मन:शांतीसाठी किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सगळ्याचा त्याग, हाच मार्ग आहे का?, असा प्रश्नही त्यातून सहज मनात उभा राहतो. महाराष्ट्रातील एकूणएक संतांनी आपल्या अभंगातून आणि भक्तीच्या अनोख्या रूपातून जो जीवनानंद दिला तो ईश्वरप्राप्तीपेक्षा कमी नाही. रोजचं जगणं जगून, संसारात राहूनही भक्ती मार्गावर चालता येते. त्याग करण्यापेक्षा नियंत्रणातून, मर्यादा पालनातूनही मन:शांती मिळते, हे संतांनी आपल्या वागणुकीतून सिद्ध करून दाखवलं. तहान-भूक, इच्छा या नैसर्गिक गोष्टी आहेत. म्हणजेच निसर्गाने दिलेल्या आहेत. त्या नाकारणे म्हणजे निसर्गाविरूद्ध जाणे, अशीही त्याची एक बाजू असू शकते. थोडक्यात मन:शांतीसाठी केवळ त्याग हाच मार्ग नाही.
जिल्ह्यात घडलेल्या या दोन घटनांमधून सर्वसामान्य माणसं आपापल्या परीने अर्थ लावून पुढे जात आहेत. दरवेळी हेच होतं. सामान्य माणसं प्रत्येक गोष्टीला आपल्यापयीने, आपल्या कुवतीनुसार अर्थ लावतात आणि पुढे जात राहतात. पण पुढे जाऊन त्यांना भुरळ पाडते ती माऊलीचीच वाट. माऊलीच्या वाटेवर जाण्यातच त्यांना आनंद वाटतो. कारण खरोखरच मानसिक शांतीचा शोध घेण्याची इच्छा असलेल्यांची संख्या खूप कमी आहे आणि चंगळवादात रमलेल्यांची संख्या अधिक. त्यामुळे तीर्थशेखर विजय यांचा त्याग कौतुकास्पद वाटतो, पण तो स्वीकारत कोणीच नाहीत.
मनोज मुळ््ये