..अन्यथा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोका!, शिवसेना ठाकरे गटाने निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले

By सुधीर राणे | Published: November 3, 2023 04:36 PM2023-11-03T16:36:54+5:302023-11-03T16:37:31+5:30

गरोदर मातांना उपचारासाठी इतर  रुग्णालयात का पाठवता?

otherwise boycott the Kankavali upazila hospital!, Shiv Sena Thackeray faction told resident medical officers | ..अन्यथा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोका!, शिवसेना ठाकरे गटाने निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले

..अन्यथा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोका!, शिवसेना ठाकरे गटाने निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले

कणकवली:  कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ती पदे कधी भरणार?  बाह्य रुग्ण विभागात डॉक्टरांना शोधावे का लागते ? आमदार नितेश राणे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत ,ते काय करताहेत? असे अनेक प्रश्न विचारत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर यांना धारेवर धरले. तसेच रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर उपजिल्हा रुग्णालयाला टाळे ठोका असेही यावेळी सुनावण्यात आले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर शुक्रवारी ठाकरे सेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,उपजिल्हा प्रमुख राजू शेटये ,तालुकाप्रमुख शैलेश भोगले , कन्हैया पारकर , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम पालव, तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.रुग्णालयात ३० अधिपरीचारीका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत.त्यापैकी ६ जणांची बदली झाली आहे. त्या जागी अजून कोणी हजर झालेले नाही. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ व भुलतज्ज्ञ हे पद रिक्त आहे. त्यामुळे छोट्या,मोठ्या शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. गोरगरीब रूग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागते. आस्थापना विभाग मध्ये वरीष्ठ लिपिक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर अद्याप कोणतेही कर्मचारी दिले नसल्याचा आरोप सतीश सावंत, सुशांत नाईक,उत्तम लोके,कन्हैया पारकर यांनी केला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून गेल्या महिन्यात २६ गरोदर मातांना रेफर का केले?डॉक्टर आहेत ना? मग बाहेर गोरगरीब रुग्णांना का पाठवले जाते ?अशी विचारणा कन्हैया पारकर यांनी केली. भूल तज्ज्ञ नाहीत तर ऑपरेशन कसे होणार? सोनोग्राफी मशीन आहे?पण तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांची बदली झाल्यामुळे सेवा ठप्प झाली आहे.

जे डॉक्टर सेवेत आहेत त्यांना बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासण्यासाठी  वेळ ठरवून द्या,भात कापणी आहे त्यामुळे साथ पसरणार आहे. त्याला जबाबदार कोण असणार ? असा सवाल सतीश सावंत यांनी केला.
डॉ. सुबोध इंगळे, डॉ. अनिकेत किर्लोसकर यांनी महिन्यातून दोनदा सोनोग्राफी तपासणी होईल, ओपीडी करण्यासाठी डॉक्टरांना वेळ ठरवून दिली जाईल, सुरक्षा रक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द केली जाईल. नव्याने एक लिपिक दिला जाईल.रक्त तपासणी २४ तासात करुन दिली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी आरोग्य सेवक प्रशांत बुचडे यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरिक्षक अमित यादव , उपनिरिक्षक शरद जेठे, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: otherwise boycott the Kankavali upazila hospital!, Shiv Sena Thackeray faction told resident medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.