...अन्यथा वेगळा निर्णय
By admin | Published: June 7, 2014 12:30 AM2014-06-07T00:30:32+5:302014-06-07T00:35:25+5:30
परब यांना निवडण्यासाठी बांदवलकर यांचे दबावतंत्र
वेंगुर्र्ले : वेंगुर्ले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीष परब यांना नगराध्यक्षपदी निवडून न दिल्यास सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी दिला आहे.
नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर हे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या मागील निवडणुकीत ठोस निर्णय घेऊ शकले नव्हते. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मनीष परब व प्रसन्ना कुबल या दोन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ जून असून प्रसन्ना कुबल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मनीष परब यांना राष्ट्रवादी पक्षाने व राष्ट्रवादीच्या सर्व नरगरसेवकांनी बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आणावे. तसे न झाल्यास आपणास पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा समाधान बांदवलकर यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचा आपण कार्यकर्ता असून विलास गावडे यांचा कट्टर समर्थक आहे. परब हे नगराध्यक्षपद चांगल्या प्रकारे सांभाळून ते शहराचा विकास करू शकतात. त्यासाठीच परब हे नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे नगरपरिषदेवर एका ठराविक घराण्याचीच सत्ता होती. परंतु त्यांनी शहराचा विकास काय केला, हे शहरसावासीयांना ठाऊक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपक्ष मजबूत करायचा असल्यास परब यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून देणे गरजेचे आहे. अन्यथा आपणास सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा बांदवलकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. (प्रतिनिधी)