Sindhudurg: ..अन्यथा 'त्या' अमेरिकन महिलेप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला द्यावे लागले असते तोंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:21 PM2024-08-07T13:21:26+5:302024-08-07T13:22:38+5:30
‘ती’ अमेरिकी महिला दहा वर्षांपासून राहत होती भारतात
सावंतवाडी : सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळून आलेल्या अमेरिकन महिलेने स्वतःला साखळदंडाने बांधून घेत बनाव रचल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान ही महिला मूळची अमेरिकन आहे. तरी गेल्या दहा वर्षांपासून भारतीय नागरिकत्व स्वीकारून तामिळनाडूमध्ये ती वास्तव्यास होती. तिचे तेथील आधार कार्ड ही आहे. त्यामुळे आता तिच्याकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे पुढे येत आहे. योगाच्या निमित्ताने दहा वर्षांपूर्वी भारतात आलेल्या या महिलेला आता पुन्हा मायदेशी परतण्याची ओढ लागली असून, मे महिन्यात तिने तसा अमेरिकन दूतावासात अर्ज ही दिल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पण, पोलिस या महिलेचा पूर्ण जबाब सांगत नसून, तो तपासाच्या दृष्टीने गृप्त ठेवण्यात आला आहे.
सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात २७ जुलैला अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस ही साखळदंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला. मात्र, अवघ्या दहा दिवसांनंतर हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले आहे. ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. पण, पोलिसांनी सर्व तपास गुप्त पद्धतीने सुरू ठेवला. जेव्हा या महिलेने जबाब पोलिसांकडे नोंदविल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
ललिता कायी कुमार एस ही अमेरिकन महिला दहा वर्षांपूर्वी योगाच्या निमित्ताने भारतात आली. तिचे वास्तव्य हे तामिळनाडूमधील एका आश्रमात होते. ती भारतात आली, तरी तिला तिची आई अमेरिकेतून पैसे पाठवत असे तिचे आईशी सतत बोलणे ही होत होते. मात्र, ललिता कायी कुमार एस ही अलीकडच्या काही महिन्यांपासून तिचे थोडेसे अधिकचे मानसिक संतुलन बिघडले होते. तिच्यावर बंगलोर गोवा दिल्ली येथील मनोरुग्णालयात उपचार ही सुरू आहेत.
सतत केरळ-मुंबई प्रवास करायची
ललिता कायी कुमार एस ही महिला केरळ-मुंबई हा प्रवास सतत करायची. त्यामुळे तिला रेल्वे कुठे थांबते हे माहीत होते. साधारणतः २३ जुलैच्या दरम्यान ती मडुरा रेल्वे स्थानकात उतरून चालत रोणापाल जंगलात गेली आणि एका झाडाला स्वतःला साखळदंडाने बांधून घेत बनाव रचला.
..तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला तोंड द्यावे लागले असते
या महिलेने स्वतःच साखळदंडाने बांधून घेत बनाव रचल्याचे उघड झाले. मात्र, जर या मागे अन्य कोण असते, तर या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक उत्तरे द्यावी लागली असती, पण आता त्या महिलेच्या जबाबाने सत्य उजेडात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तपास पथक अद्याप तामिळनाडूत
ललिता कायी कुमार एस या महिलेने जरी जबाब दिला असला, तरी या प्रकरणामागे अन्य कोण आहे का? तसेच तिचे लग्न झाले आहे का? तिच्या सोबत अन्य कोण राहत होते. तिचे वास्तव्य कुठे-कुठे होते, या सर्वाची माहिती घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक तामिळनाडूमध्ये ठाण मांडून आहे.