..अन्यथा भविष्यकाळ अडचणीचा, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती
By सुधीर राणे | Published: November 29, 2023 06:36 PM2023-11-29T18:36:06+5:302023-11-29T19:13:30+5:30
संविधान बचाव यात्रेचे कणकवलीत स्वागत
कणकवली : संविधान बचाव ही बहुजनांची गरज आहे. अन्यथा भविष्य काळ सर्वांसाठी अडचणीचा असेल. भारतीय संविधानाची पायमल्ली करुन देश हुकुमशाहीकडे जात आहे. अन्याय अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे बहुजनांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, रिपब्लिक सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे त्यांची संविधान बचाव यात्रेनिमित्त कॉर्नर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
रिपब्लिकन सेनेची ही संविधान बचाव यात्रा आज कणकवलीत आली. दिक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी या ठिकाणी पोहचेल.
कणकवली येथील बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आनंदराज आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी आनंदराज आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, सिंपण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस प्रकाश करुळकर, दत्ता पवार, धनाजी जाधव, बी .एस. कदम, सुशील कदम, तानाजी कांबळे, संदीप कदम आदी उपस्थित होते.
यावेळी अनिल तांबे म्हणाले, संविधान बचाव यात्रा घेऊन बहुजनांचा लढा आनंदराज आंबेडकर लढत आहेत. राज्यभर संविधान बचाव यात्रा सुरू आहे. या यात्रेतून संविधान बचाव करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. कणकवलीतही आनंदराज आंबेडकर यांचे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले.