त्यांच्या जीवनातून भाजलेला उंदीर अन् मुंग्याची चटणी झाली हद्दपार

By admin | Published: May 12, 2015 10:23 PM2015-05-12T22:23:28+5:302015-05-12T23:42:23+5:30

आमटे दाम्पत्य : उलगडली अडाणी, अशिक्षित अन् भोळ्या हजारो आदिवासींच्या बदलत्या आयुष्याची कहाणी

Out of their lives baked rats and ants are chutneys | त्यांच्या जीवनातून भाजलेला उंदीर अन् मुंग्याची चटणी झाली हद्दपार

त्यांच्या जीवनातून भाजलेला उंदीर अन् मुंग्याची चटणी झाली हद्दपार

Next

राजापूर : समाजातील विविध जाती-धर्माच्या भिंती तोडून मानवता हाच धर्म समजून आपल्या वडिलांनी ज्यावेळी कुष्ठरोग्यांची सेवा सुरु केली, त्यावेळी अनंत अडचणींचा सामना करावा लागला होता. ज्यावेळी बाबांनी हा वारसा हाती घेतला, त्यावेळी नवल वाटेल, पण उंदीर भाजून आणि मुंग्याची चटणी खाऊन आदिवासी जगत होते. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉ. मंदा आमटे यांनी येळवण येथे आपल्या कार्याचे कंगोरे उलगडले.
येळवणमधील विद्यानिकेतनमध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदा आमटे यांनी भेट दिली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. आमटे यांच्यासमवेत अनेक मंडळीदेखील आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या नियोजित दौऱ्यासाठी निघालेल्या आमटे दाम्पत्याने वेळात वेळ काढून येळवण विद्यालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी कोणतेच भाषण न करता उपस्थितांशी थेट संपर्क साधला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. चद्रकांत देशपांडे, निवृत्त शिक्षिका सीमा गांगण, रेवती कुवळेकर आदींनी आपटे दाम्पत्याशी गप्पा मारल्या.
हेमलकसा अशा आदिवासी भागात काम करतानाचा अनुभव कसा वाटला, त्यावर त्यांनी दिलेली माहिती थरारक होती. मुळातच तो भाग अत्यंत दुर्गम आहे. तेथे राहणारी आदिवासी जनता फारच घाबरट होती. कुपोषणाचे प्रमाण फार मोठे होते. एखादा उंदीर आढळला, तर त्याला पकडायला अनेकजण धावायचे. नंतर पकडलेल्या उंदराला भाजून खाल्ले जायचे. मुंग्यांची चटणी केली जायची. उदरनिर्वाहासाठी माकडांचीदेखील शिकार व्हायची. हे चित्र कुठेतरी बदलायला हवे होते. या आदिवासींना मूळ प्रवाहात आणण्याचा आपण निर्णय घेतला व कामाला लागलो.
पशुपक्षीदेखील त्यांच्याकडे आहेत. सुमारे १२५ प्राणी त्यांच्या घरी आहेत. त्यामध्ये मगर, वाघ, तरस असे हिंस्त्र प्राणीदेखील आहेत. स्वत: डॉ. आमटे त्यांच्याशी खेळतात, तर त्यांची नातवंडे सर्पासह, घोणस अशा विषारी जीवांशी बागडतात. या सर्वांचे त्यांनी एका चित्रफितीद्वारे उपस्थितांना दर्शन घडविले.
समाज मनाला तडे घालवणाऱ्या काही हिंस्त्र माणसापेक्षा हे प्राणी नक्कीच चांगले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. लग्नापूर्वी समाजसेवा, जंगल याबाबत अनभिज्ञ असलेल्या डॉ. मंदातार्इंनी आपल्या पतीसमवेत आदिवासींसाठी जंगलात जीवन व्यथित केले. त्यावेळचे त्यांचे अनुभव विलक्षण स्वरुपाचे होेते. तो परिसरच असा अवघड होता की, जेथे वीज नव्हती, फोनची व्यवस्था नव्हती. सर्वत्र जंगल एके जंगलच होते. मनुष्यवस्ती कुठेच नव्हती, असे अनुभव आले. ज्यावेळी देशात आणिबाणी लागली (२५ जून १९७५) त्याची खबर आपल्याला खूप उशिराने कळली, अशी त्यांनी माहिती दिली.
यावेळी आमटे दाम्पत्याने आपल्या कार्यात समाजाचा फार मोठा वाटा असल्याचे अभिमानाने सांगितले. सद्यस्थितीत दहशतवाद व नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असून, तो जागतिक पातळीवरील विषय असला तरी मानवाला दोन वेळचे पुरेसे अन्न व आवश्यक गरजा वेळीच मिळाल्यास नक्षलवादासारख्या प्रकारांवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मानवता धर्म समजून वागले पाहिजे, गोरगरीब मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी येळवणचे भिकाजी मलुष्टे व त्यांच्या परिवारातील अन्य दोन सदस्यांनी मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याचे स्पष्ट करीत तसा अर्ज डॉ. आमटे यांच्याकडे सादर केला, तर येळवणमधील शिक्षक व काही ग्रामस्थांनी एकत्रित ११ हजारांची मदत डॉ. आमटे यांच्या कार्याला सुपूर्द केली. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचे नूतन संचालक महादेव सप्रे, शिवाजी मोरे, संभाजी केळुस्कर, केशव मसुरकर, अ. कृ . कुलकर्णी, आबा आडिवरेकर, पाचलचे उपसरपंच किशोर नारकर, मोहन नारकर, उदय सक्रे, रमेश सकपाळ, जगदीश राणे, दशरथ जाधव, विलास लाड, शिवाजी आयरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)


कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी सदैव झटणाऱ्या आमटे कुटुंबीयांच्या कृपेने अनेक कुष्ठरोगी सन्मानाने जीवन जगत आहेत, तर असंख्य आदिवासी तरुण - तरुणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत, अशी माहिती यावेळी प्रकाश आमटे यांनी बोलताना दिली.

Web Title: Out of their lives baked rats and ants are chutneys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.