पंचायत समितीच्या जावक नोंदवहीत हेराफेरी
By admin | Published: November 26, 2015 09:34 PM2015-11-26T21:34:55+5:302015-11-27T00:06:43+5:30
सखोल कारवाईची मागणी : सुरेश कामत यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
वेंगुर्ले : वेंगुर्ले पंचायत समितीच्या जावक नोंदवही या महत्त्वाच्या रजिस्टरमध्ये २४ जुलै २0१४ रोजी १0७६ या एकाच जावक नंबरने पत्रे पाठविण्याचा, तर १६ जानेवारी २0१४ मध्ये जावक क्रमांक ४१९९ हा अंक जुळविण्यासाठी शेवटचे नंबर गिरवण्याचा प्रताप बारानिशी लिपिकाने केला आहे. तरी ती पत्रे सुप्रिया सुरेश कामत यांना मिळालीच नाहीत. कामत यांंनाच पाठविलेल्या पत्र संदर्भातील घातलेल्या नोंदी या संबंधित बारानिशी लिपिक हजर असताना दुसऱ्याच्या हस्ताक्षरात आहेत. याबाबतची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कामत यांचे पती सुरेश कामत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, वेंगुर्लेच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे या विषयासंदर्भात केलेल्या तक्रारी अर्जानुसार कर्मचाऱ्यांचीच फक्त चौकशी एकतर्फी केली. तक्रारदारासमोर चौकशी केली नसल्याने चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार गटविकास अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेळीच चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी सुरेश कामत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भारतीय संघ राज्याच्या सन २0११ च्या जनगणनेचे काम वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षक वर्ग व अन्य शासकीय कर्मचारी यांनी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम केले होते. त्यांचा प्रशिक्षण भत्ता व मानधन भत्ता संबंधी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ८ मार्च २0१३ रोजी संबंधितांना ते अदा करण्यासाठी प्रत्येक तहसीलदार यांना कळविले. वेंगुर्ले तहसीलदार यांनी ती रक्कम स्वत: अदा न करता १८ जुलै २0१३ रोजी वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांचेकडे जनगणना करणाऱ्यांची यादी धनादेशासहित पाठविली. तांत्रिक अडचणीबाबत गटशिक्षणाधिकारी यांना १४ आॅगस्ट २0१३ ला पाठविले. या जनगणनेचे ४८ लाभार्थी असून, वेळीच भत्ता व मानधन न मिळाल्याने तहसीलदार यांचेकडे सुरेश कामत यांनी तक्रार केली. या तक्रारीनुसार सुप्रिया सुरेश कामत यांना वेंगुर्ले गटविकास अधिकारी कार्यालयाकडून १६ जानेवारी २0१४ व २४ जुलै २0१४ अशी दोन पत्रे पाठविल्याची माहिती, माहितीच्या अधिकारात कामत यांचे पती सुरेश कामत यांना प्राप्त झाली. मात्र दोन्हीपैकी एकही पत्र न मिळाल्याने माहितीच्या अधिकारात कागदपत्रे सुरेश कामत यांंनी घेतली. त्यामध्ये पंचायत समिती जावक नोंदवहीत १६ जानेवारी २0१४ च्या सुप्रिया कामत यांच्या पत्राचा जा. क्र. ४१९९ हा जुळविण्यासाठी शेवटचे नंबर गिरविण्याचा, तर २४ जुलै २0१४ च्या पत्राचा १0७६ या एकाच क्रमांकावर दोघांना पत्रे पाठविल्याचा प्रताप बारानिशी लिपिकाने केल्याचे उघड झाले. यात आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया कामत यांना पाठविलेल्या त्या दोन्ही पत्रांची नोंद नियमीत लिपिक हजर असताना दुसऱ्याच्या हस्ताक्षरात आहे. त्यामुळे या शासकीय महत्त्वाच्या रजिस्टरवर जो बनवाबनवीचा प्रकार घडला आहे त्याला वेळीच आळा बसावा, यासाठी तसेच वेंगुर्ले पंचायत समितीच्या महत्त्वाच्या जावक रजिस्टरमध्ये बोगस नोंद घालणारी व्यक्ती कोण? त्याची शहानिशा हस्ताक्षरांवरून करावी. कुठल्याही प्रकरणात एकतर्फी चौकशी करण्याचा कायदा नसताना वेंगुर्लेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तक्रारदारा अपरोक्ष एकतर्फी चौकशी करून मूग गिळून गप्प राहण्याचे कारण काय? पाठविलेली पत्र जा. क्र. नुसार बरोबर पाठविली तर ती न मिळण्याचे कारण काय? याची उत्तरे शोधण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदार सुरेश कामत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली असून गटविकास अधिकारी यांनी केलेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या चौकशीत या कर्मचाऱ्यांनी बोगस नोंदीची जबाबदारी आहे. मग ती नोंद घालणारा पंचायत समितीच्या कार्यालयाव्यतिरिक्त बाहेरची व्यक्ती आहे काय? असा सवाल निर्माण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)