सहा कोटीचे जादा उत्पन्न
By admin | Published: April 2, 2015 09:28 PM2015-04-02T21:28:42+5:302015-04-03T00:47:01+5:30
परिवहन महामंडळ : दोन वर्षांपेक्षा यंदा अधिक उत्पन्न, एस. टी.च्या विविध योजनांचा फायदा
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी अधिक उत्पन्न मिळाले आहे. चालू वर्षी २३५ कोटी ७३ लाख ६४ हजारांचे उत्पन्न आगाराने मिळविले आहे. रत्नागिरी विभागाला ६ कोटी १३ लाखांचे अधिकचे उत्पन्न यावर्षी लाभले आहे.ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. परंतु, अनेकवेळा कमी भारमानामुळे अनेक फेऱ्या तोट्यात चालवाव्या लागतात. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत रत्नागिरी विभागाने अधिक उत्पन्न मिळवल्याने रत्नागिरी विभागाला ‘अच्छे दिन’ आले असल्याचे दिसून येत आहे. २०१२-१३ मध्ये १९७ कोटी ६१ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले, तर २०१३-१४ मध्ये २१९ कोटी ६० हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.रत्नागिरी विभागामध्ये ७८४ गाड्या असून २ लाख २५ हजार किलोमीटर इतकी वाहतूक करण्यात येते. दररोज किमान ५३ हजार लीटर डिझेलचा वापर केला जातो. चालक १७३८ असून वाहक १५५५ आहेत. दररोज ९ हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. खासगी वाहतुकीचा एस. टी.च्याउत्पन्नावर परिणाम होत असला, तरी यावर्षी रत्नागिरी विभागाने मागेल त्याला गाडी ही अभिनव संकल्पना राबविली. याशिवाय प्रवासी वाढवा अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक केली. एकूणच एस. टी.ला मागणी वाढत आहे. याशिवाय निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामध्ये एसटीला मागणी होत आहे. तसेच कोकण रेल्वे ठप्प झाल्यास एस. टी.चे सहाय्य घेतले जात असल्याने साहजिकच एस. टी.च्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे उत्पन्न वाढेल असा विश्वास एस. टी.चे अधिकारी व्यक्त करीत आहेत.(प्रतिनिधी)
एसटीच्या रत्नागिरी विभागाची आगारनिहाय वाढ (कोटीत)
आगार१४/१५१३/१४१२/१३
दापोली२८.८१.४९२६.३८.७१२४.४७.४८
खेड२८.८०.२५२६.५०.३१२३.४४.२३
चिपळूण३९.१७.३८३५.६०.१९३२.३३.६५
गुहागर२४.५२.०७२२.६१.९३२०.०७.११
देवरुख२३.५९.३७२३.३६.०४२०.३१.९५
रत्नागिरी४८.०५.९७४४.५९.८०४१.२९.१७
लांजा१४.८२.९३१४.१४.९७१२.११.४६
राजापूर१६.३०.३६१५.७९.५२१३.७७.२७
मंडणगड११.६३.८२१०.१९.१३०९.७९.१८
एकूण२३५.७३.६४२२९.२०.६०१९७.६१.५०