आॅक्सिजन सिलिंडर्सचा स्फोट

By admin | Published: May 10, 2016 09:56 PM2016-05-10T21:56:39+5:302016-05-10T22:03:55+5:30

सटाण्यात अग्नितांडव : घरासह चार दुकाने खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

Oxygen Cylinder Blast | आॅक्सिजन सिलिंडर्सचा स्फोट

आॅक्सिजन सिलिंडर्सचा स्फोट

Next

 सटाणा : आॅक्सिजन सिलिंडर घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याने सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरासह चार दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. या दुर्घटनेने पुन्हा एकदा बायपास रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मंगळवारी संतप्त वकील संघाने तहसील कार्यालयावर ठिय्या तर डॉक्टर असोसिएशनने तहसीलवर मोर्चा काढून प्रशासनाचा जाहीर निषेध करून बायपासचे राजकारण न करता काम मार्गी लावण्याची मागणी
केली.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सुरत येथून आॅक्सिजन सिलिंडर घेऊन पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर अचानक शहरातील व्ही.पी.नाईक विद्यालया-जवळील दुभाजकावर आदळला. यामुळे कंटेनर उलटून सिलिंडर रस्त्यावर आदळल्याने एका सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंटेनरला आग लागली.
मंगळवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे बायपासचा प्रश्न रखडल्याचा आरोप केला आहे. काल संतप्त डॉक्टर असोसिएशनचे डॉ.व्ही.के. येवलकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करून बायपास रस्ता तत्काळ सुरू करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला, तर बायपाससाठी गेल्या दहा महिन्यापासून सटाणा वकील संघ पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहे. कालच्या दुर्घटनेने संतप्त वकील संघाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून बायपासचे काम सुरू करण्याची मागणी केली. मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त वकील संघाने तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या दालनातच चार तास ठिय्या देऊन जोपर्यंत काम सुरू करत नाही तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
डी.सी. झांबरे, आमदार दीपिका चव्हाण यांनी आंदोलनकर्त्या वकिलांची भेट घेऊन एक तासांच्या चर्चेनंतर येत्या १२ मेपासून जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.
आंदोलनात पंडितराव भदाणे, सी.एन. पवार, रेखा शिंदे, नितीन चंद्रात्रे, विष्णू सोनवणे, वसंत सोनवणे, सरोज चंद्रात्रे, सतीश चिंधडे, डॉ. अमोल पवार, डॉ. अतुल जाधव,
डॉ. प्रकाश जगताप सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Oxygen Cylinder Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.