भात खरेदी जुन्या पद्धतीनेच करावी, आॅनलाईन खरेदी अडचणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:25 PM2017-12-01T17:25:46+5:302017-12-01T17:31:49+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदी मार्केटिंग फेडरेशन हि संस्था करते. शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्याकामी एजंट म्हणून जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघ काम करतात. परंतु यावर्षी मार्केटिंग फेडरेशन या संस्थेने कडक नियम आणले आहेत. आॅनलाईन पद्धतीने भात खरेदी करणार आहेत. परंतु मुळातच ही खरेदी लांबली आहे. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनने जुन्या पद्धतीने यावर्षीही भात खरेदी करावी, अशी मागणी जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी एन. जी. गवळी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भात खरेदी मार्केटिंग फेडरेशन हि संस्था करते. शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्याकामी एजंट म्हणून जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघ काम करतात. परंतु यावर्षी मार्केटिंग फेडरेशन या संस्थेने कडक नियम आणले आहेत. आॅनलाईन पद्धतीने भात खरेदी करणार आहेत. परंतु मुळातच ही खरेदी लांबली आहे. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनने जुन्या पद्धतीने यावर्षीही भात खरेदी करावी, अशी मागणी जिल्हा व तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी एन. जी. गवळी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ संस्थेच्या सभागृहात जिल्हा खरेदी विक्री संघ अध्यक्ष व्हिक्टर डांटस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी फेडरेशन अधिकारी गवळी यांच्यासह कुडाळ संघ अध्यक्ष गंगाराम परब, कणकवली अध्यक्ष अरुण गावडे, व्यवस्थापक गणेश तावडे, दिनेश ढोलम, अनुमान वराडकर, महेश परब, एकनाथ सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी मार्केटिंग फेडरेशनने आॅनलाईन भात खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भात विकणाऱ्या शेतकऱ्याला सात बारा द्यावा लागणार आहे. या सातबारात सहहिस्सेदार असल्यास त्यांची संमती लागणार आहे. शेतकऱ्याने विकलेल्या भातातून आलेल्या पैशातून शेती कर्ज रक्कम परस्पर वळती केली जाणार आहे. भात खरेदी करताना लागणारी रक्कम खरेदी विक्री संघांनी स्वत: उभी करायची आहे. खरेदी केलेल्या भाताचे संरक्षण करण्याची जबाबदारी खरेदी विक्री संघाकडे ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शासकीय गोदाम नाही. अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत.
गतवर्षी १५ हजार क्विंटल भात खरेदी झाले होते. त्याचे दोन कोटी ५२ लाख ५४ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. एका क्विंटलला १५५० रुपये भाव देण्यात आला होता. मात्र, गेल्या दोन वर्षात खरेदी केलेल्या भाताची अद्याप उचल झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात गोदामे शिल्लक नाहीत. यावर्षी सातबारा, आधारकार्ड व बँक खाते नंबर दिल्यानंतर हि यादी पणन विभागाकडे जाणार आहे. त्यानंतर भात खरेदी प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आॅक्टोबर महिन्यात हि प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. जिल्ह्यात अनेक सातबारावर मयत व बाहेर राहणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांची संमती मिळविणे शक्य नाही. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडून करून घेतलेल्या अग्रीमेंट प्रमाणे यावर्षीही भात खरेदी करावी, अशी मागणी खरेदी विक्री संघांच्यावतीने करण्यात आली आहे.
गेल्यावर्षीच्या सहा-सहा लाख येणे
शेतकऱ्यांकडून भात खरेदी करताना लागणारी रक्कम खरेदी विक्री संघांनी उपलब्ध करण्यास मार्केटिंग फेडरेशनने सांगितले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या प्रत्येक संघाचे सहा-सहा लाख रुपये फेडरेशन देणे आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज घेत संघांनी ही खरेदी केली होती. त्याचे व्याज भरावे लागत आहे. दरम्यान, मार्केटिंग फेडरेशनने पर्याय काढला नाही. तर ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे जिल्हा संघ अध्यक्ष डांटस यांनी सांगितले.