भात कापणीच्या वेळी अनेक आजार डोके वर काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:25 PM2017-10-11T17:25:12+5:302017-10-11T17:32:34+5:30
खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.
कडावल,11 : ग्रामीण भागात भातकापणीच्या कामास वेग आला आहे. परिणामी लेप्टो स्पायरोसिसच्या जीवाणूंचे वसतिस्थान असणाºया भात खाचरांशी आता शेतकºयांचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचे बळी घेतलेल्या या रोगाचे सावट अद्याप पूर्णत: दूर झालेले नाही. खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला गेल्या काही वर्षांपासून लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही गावांपर्यंतच मर्यादित असलेल्या लेप्टोने नंतर जिल्ह्याच्या इतर भागातही थैमान घालायला सुरुवात केली. या रोगामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लेप्टोच्या प्रभावाखाली प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अधिक प्रमाणात आल्याचे दिसून येते. विशेषत: भात लावणी व भात कापणीच्या काळातच या रोगाचा अधिक फैलाव झाल्याचा पूर्वेतिहास असून आजपर्यंत या रोगामुळे गेलेल्या बळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिक आहे.
लेप्टो जीवाणूंचे उगमस्थान असलेल्या उंदीर, घुशींचा वावर जेथे अस्वच्छता व अडगळ असेल तेथे मोठ्या प्रमाणात असतो. तेथे त्यांनी विसर्जित केलेल्या मूत्रातील जीवाणू आसपासच्या परिसरात तसेच भात खाचरात स्थिरावतात. केवळ दोन मिली मूत्रात सुमारे दहा कोटी जीवाणूंचा अधिवास असू शकतो. यावरून याची भयानकता सहज लक्षात येते. पायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा व इक्टिरोहिमोरेडिका इत्यादी लेप्टोचे प्रमुख ज्ञात जीवाणू आहेत.
लेप्टोचा फैलाव झाला की, पौष्टिक आहार घ्या, पायात गमबूट घाला, हातमोजांचा वापर करा असे सल्ले आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून शेतकºयांना दिले जातात. मात्र एका गमबूटची किंमत आज एक हजार रूपयांच्या आसपास आहे. एवढा खर्च गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेर आहे. दरम्यान, परिसरात भातकापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकरी दिवसभर भातखाचरात राबत आहेत. लेप्टोची काळी छाया अद्यापही पूर्णत: दूर झालेली नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना भातकापणी बरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावत आहे.