रस्त्यांची दुरावस्था, शासनाला जाग आणण्यासाठी 'ठाकरे शिवसेनेकडून' ३० ऑक्टोबरला पदयात्रा
By सुधीर राणे | Published: October 16, 2023 05:29 PM2023-10-16T17:29:13+5:302023-10-16T17:30:42+5:30
गगनबावडा ते तळेरे २१ कि.मी. रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करणार
कणकवली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी गगनबावडा, करूळ, वैभववाडी ते तळेरे रस्त्याची पाहणी पदयात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक ३० ऑक्टोबर रोजी करणार आहेत. शिवसेनेच्या या पदयात्रेची गगनबाबडा (सिंधुदुर्ग हद्द) येथून सकाळी सुरूवात होऊन ते तळेरे पर्यंत २१ कि.मी. अंतर पार करत सायंकाळी सांगता होणार आहे. शासनाने या समस्येकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.
कणकवली येथील विजय भवनमध्ये आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या पदयात्रेत आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, पदाधिकारी या पदयात्रेत सामील होणार आहेत.
गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गणेशचतुर्थीपूर्वी शिवसेनेच्यावतीने तळेरे ते वैभववाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यावेळी केवळ आश्वासने देण्यात आली. सध्या हा रस्ता वाहतूक योग्य नाही. २५० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येथील रस्ते दुरुस्तीसाठी होता. भवानी कस्ट्रक्शन कंपनीने ४० टक्के कमी दराने निविदा घेतली असून गणेशचतुर्थी काळात खड्डे सुद्धा बुजवलेले नाहीत. अजूनही खड्डे दुरुस्ती अथवा डांबरीकरणचे काम सुरू केलेले नाही. ३० ऑक्टोबर पूर्वी रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहोत.
दिवाळी सण जवळ येत असून पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. ऊस वाहतूक, गौण खनिज वाहतूक करूळ, गगनबावडा मार्गे होत असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग हा आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला नसल्याने अपघात होत आहेत. त्याची भीती वाहनधारक आणि जनतेच्या मनात बसली आहे. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत यावा यासाठीच हा प्रश्न आम्ही हाती घेतला आहे. असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.
निविदा प्रक्रियेची चौकशी करा !
तळेरे- गगनबावडा रस्त्याच्या कामाचा महामार्ग प्राधिकरणचा ठेका ४० टक्के कमी दराने ठेकेदाराने घेतला आहे. म्हणजेच मुळात ही निविदा प्रक्रिया चढ्या दराने लावण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. २५० कोटींचे काम जर ठेकेदार ४० टक्के कमी दराने करत असेल, तर नक्कीच ह्या निविदा प्रक्रियेत घोळ आहे. या चढ्या दराने लावण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची आम्ही चौकशी लावण्याची मागणी करणार असल्याचे अतुल रावराणे यांनी यावेळी सांगितले.