आंबोली घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:25 PM2020-07-17T14:25:12+5:302020-07-17T14:25:36+5:30
आंबोली घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, एकेरी वाहतूक सुरू आहे.
सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. आंबोली येथील घाटात दरडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला आहे. ही घटना पूर्वीचा वस देवस्थानपासून खाली दोनशे मीटर अंतरावर घडली आहे. गेल्या चार ते पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाट असुरक्षित बनला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. आंबोली घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार आंबोली घाटात घडत असतात.
कोरोनाच्या संकटामुळे आंबोली वर्षा पर्यटनासाठी बंद असली तरी कोल्हापूर-बेळगावमार्गे दिशेनं ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. तत्पूर्वीही अशाच दरडी कोसळून दोघांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना करून घाटातील दुहेरी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून केली जात आहे.