मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश
By सुधीर राणे | Published: August 14, 2023 12:28 PM2023-08-14T12:28:24+5:302023-08-14T12:31:22+5:30
ही चित्रे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची भयानक व विदारक स्थिती दर्शवणारी होती
कणकवली: महिलांवर होणाऱ्या देशातील अत्याचार व मणिपूर हिंसाचाराचा गोवा तसेच महाराष्ट्रातील चित्रकारांनी येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात चित्रांच्या माध्यमातून निषेध केला. 'भारत माता की जय', 'हम सब एक है', 'संविधानाचा विजय असो' अशी त्यांनी घोषणाबाजीही केली. मणिपूरमध्ये घडत असलेल्या अमानवी कृत्यांच्याबद्दलही आक्रोश व्यक्त केला.
अखंड लोकमंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनिकेत कांबळे, महेश सौदती, ज्ञानेश्वर परभणे, चेतन शेख, मयुरी च्यारी-गावडे, नामानंद मोडक, प्रभाकर कांबळे, सिद्धार्थ गावडे, राजेंद्र उसगावकर, सुरेंद्र जगताप, अमित भोगटे, रुमिंग रॉड्रिक्स, तौसीफ मतवाळ आदी चित्रकारांनी चित्र रेखाटून मणिपूर हिंसाचाराचा निषेध केला. ही चित्रे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची भयानक व विदारक स्थिती दर्शवणारी होती. यावेळी काही चित्रकारांनी गाण्यांतून मणिपूरमध्ये घडत असलेल्या कृत्यांबद्दल आक्रोश व्यक्त केला.
चित्रकारांना विनायक मेस्त्री, संदीप सावंत, सादीक कुडाळकर, आनंद चव्हाण, विनायक सापळे, यश मोडक, व्ही. के. सावंत, अशोक करंबेळकर यांच्यासह नागरिकांनी पाठिंबा देत हिंसाचाराचा निषेध केला.