पाकिस्तानी नागरिक सकारात्मक
By admin | Published: February 11, 2016 11:17 PM2016-02-11T23:17:22+5:302016-02-11T23:33:42+5:30
देवयानी खोब्रागडे : सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
मालवण : भारत-पाकिस्तान या दोन शेजारील देशात संघर्ष असला तरी पाकिस्तानातील नागरिकांना भारताविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पाकिस्तानातील नागरिक आपुलकी जोपासणारे आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या मानसिकतेचा विचार केला तर त्यांचा भारताशी मैत्री करण्यासाठी सदैव हात पुढे आहे. तेथील राज्यकर्ते आणि लष्कर यांच्या कठोर धोरणामुळे दोन देशातील मैत्रीचे संबंध दृढ होण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. असे असले तरीही पाकिस्तानी नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी सकारात्मक असल्याच्या भावना भारतीय विदेश मंत्रालयातील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी व्यक्त केल्या.
भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, तसेच पर्यटनाला अधिक चालना मिळावी या हेतून पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी क्रीडा मंत्री व धावपटू पॅट फार्मर हे कन्याकुमारी ते काश्मीर अशी दौड करत आहेत. गेले तीन-चार दिवस ते महाराष्ट्र राज्यात दौड करत आहेत. या अनुषंगाने विदेश मंत्रालयात महाराष्ट्र राज्याची संचालक म्हणून कार्यरत असलेल्या देवयानी खोब्रागडे सिंधुदुर्गात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. मात्र अद्यापही पर्यटन स्थळांचा अपेक्षित विकास झालेला नाही. देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी येत असताना त्या दर्जाची हॉटेल्स, वाहतूक आणि दळणवळणाची साधने अपुरी आहेत. त्यामुळे निसर्गसंपन्नता आणि पर्यावरण टिकून पर्यटनदृष्ट्या विकास झाला तरच पर्यटनाला चालना मिळेल, असेही खोब्रागडे यांनी सांगितले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देत मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत, युवक काँग्रेसचे बाबा परब यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खोब्रागडे : भारतात कुठेही असहिष्णुता नाही
भारतात समानता नांदत आहे. देशात सर्वत्रच केवळ काही महिन्यापूर्वी असहिष्णुतेबाबत रान उठवले गेले होते. मात्र, कोणी असहिष्णुता भाष्य करतो म्हणजे देशात असहिष्णुता निर्माण होत नाही. त्यामुळे भारतात कुठेही असहिष्णुता नसल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. आपण विदेश मंत्रालयात सेवा बजावत असताना जगातील सर्वच देशातील नागरिकांना अनुभवता आले आहे. पाकिस्तानबाबत विचार करता तेथील नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी फारच सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीमंती हा यशाचा मार्ग नव्हे?
पैसा आणि श्रीमंती हा उच्च शिक्षणाचा पाया नसून, ध्येय आणि आत्मविश्वास हा यशाचा मार्ग आहे. विद्यार्थीदशेत ध्येय निश्चित करून यशाच्या मार्गावर जात असताना भारतातच उच्चपदाचे अधिकारी नव्हे तर विदेशातही बडे अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवावा. मुलींनीही कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता यशाच्या दिशेने वाटचाल करावी. छेडछाड, अन्याय, अत्याचाराला बळी न पडता मुलीनीही आक्रमक बनावे, असे आवाहन खोब्रागडे यांनी केले.