सिंधुदुर्गातील पॅनकार्ड गुंतवणूकदारांची समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 04:49 PM2017-10-10T16:49:07+5:302017-10-10T16:49:35+5:30
पॅनकार्ड कंपनीने आपला गाशा गुंडाळल्यानंतर हवालदिल झालेले गुंतवणूकदार व एजंट यांनी समिती गठीत केली आहे. ही समिती आता आपले पैसे परत मिळावेत यासाठी कंपनीविरोधात लढाई लढत आहे. राष्ट्रशक्ती संघटनेने या गुंतवणूकदारांना साथ दिली असून ठेवी परत मिळेपर्यंत गुंतवणूकदारांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर यांनी दिले आहे.
कणकवली,10 : पॅनकार्ड कंपनीने आपला गाशा गुंडाळल्यानंतर हवालदिल झालेले गुंतवणूकदार व एजंट यांनी समिती गठीत केली आहे. ही समिती आता आपले पैसे परत मिळावेत यासाठी कंपनीविरोधात लढाई लढत आहे. राष्ट्रशक्ती संघटनेने या गुंतवणूकदारांना साथ दिली असून ठेवी परत मिळेपर्यंत गुंतवणूकदारांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर यांनी दिले आहे.
सिंधुदुर्गातील पॅनकार्ड कंपनीचे गुंतवणूकदार व एजंट यांची बैठक येथील दुर्गाराम मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीला राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुकुटराव मोरे, नंदकुमार गावडे, नकुल पार्सेकर व राष्ट्रशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी संदीप उंबळकर व सचिवपदी सचिन वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.
पॅनकार्ड कंपनीचे एकूण गुंतवणूकदार ५५ लाख असून महाराष्ट्रात २५ ते ३0 लाख गुंतवणूकदार आहेत. न्यायालयीन लढाईनंतरही पैसे न मिळाल्यामुळे लोकांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी पुणे येथील राष्ट्रशक्ती संघटनेने घेतली आहे. राष्ट्रशक्ती संघटना गुंतवणूकदारांना आता मदत करणार आहे.
प्रास्ताविक मुकुटराव मोरे यांनी केले.
नकुल पार्सेकर यांनी पॅनकार्ड व राष्ट्रशक्ती यांचा संबंध कसा आला याबाबत माहिती दिली. पॅनकार्डच्या शेवटच्या गुंतवणूकदाराला पैसे मिळेपर्यंत राष्ट्रशक्ती संघटना गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ज्ञानेश्वर दारवटकर यांनी दिली. बैठकीला सिंधुदुर्गातील ८00 गुंतवणूकदार व २00 एजंट उपस्थित होते.
पॅनकार्डच्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून आवाज उठविला होता. मात्र एजंटांनी आता संघटित होऊन राष्ट्रशक्तीचा आधार घेतल्यामुळे लढ्याला यश येईल, अशी आशा आता समितीच्या पदाधिकाºयांना वाटत आहे. आभार नंदकुमार गावडे यांनी मानले.