तलाठ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: May 15, 2015 10:25 PM2015-05-15T22:25:37+5:302015-05-15T23:33:49+5:30
मुंबरकरांवरील कारवाई मागे घ्या : जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकवटले
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे शुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर लक्षणीय धरणे आंदोलन झाले. निलंबित मंडल अधिकारी मुंबरकर यांना पुन्हा रुजू करा, या मागणीसाठी ३५० कर्मचारी एकवटल्याने या कर्मचाऱ्यांची संघटनात्मक ताकद दिसली.रत्नागिरी- सिंधुदुर्ग तलाठी संघाच्या नेतृत्वाखाली ६ मेपासून जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे आंदोलन सुरू झाले आहे. आचरेचे प्रभारी मंडल अधिकारी बी. जे. मुंबरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई अन्यायकारक आहे. वाळू किंवा गौणखनिज तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे मंडल अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी या संघटनेने शासनाकडे पूर्वीच केलेली आहे. ज्या दिवशी वाळूची चोरी झाल्याची घटना घडली त्या दिवशी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नायब तहसीलदारांनी हे गुन्हे दाखल करायला हवे होते. तसे न करता मंडल अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरच १ मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल या सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असेही या संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने सन २०१० मध्ये परिपत्रक काढले आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाळू किंवा गौणखनिज उत्खननाकरिता पर्यायांची निर्मिती कशाप्रकारे असावी? पथक प्रमुख कोण असावा? गुन्हे कोणी दाखल करावेत? हे त्या परिपत्रकात नमूद आहे.
मंडल अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल करू नयेत, असे असतानाही वरिष्ठ अधिकारी खात्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत ही खेदाची बाब आहे, असेही मत रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघटनेचे संघटनाध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
...तर बेमुदत सामूहिक रजेवर
जिल्हा महसूल प्रशासनाने त्या मंडल अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवाल १६ मेपासून सामूहिक रजेवर जातील व पूर्णपणे कामबंद करतील, असाही इशारा या संघटनेने जाहीर केला आहे.
महसुली काम ठप्प
शुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर झालेल्या या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील ३५० कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याने गावातील महसुली कामकाज ठप्प झाले आहे. जिल्हाध्यक्ष एस. व्ही. गवस, उपाध्यक्ष एस. जी. जाधव, सरचिटणीस डी. एम. पाटील, एन. जी. बांबरकर, कोदे, यादव, विलास डगरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदनही सादर केले.