पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:36 PM2023-01-06T12:36:17+5:302023-01-06T12:40:37+5:30
वारकऱ्यांना मिळाला दिलासा
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्यावतीने पंढरपुर माघवारीसाठी वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडे सेवा सवलतीबाबतची मागणी करण्यात आली होती. विभाग नियंत्रकानी त्या मागणीची दखल घेतली असून जिल्ह्यातील सर्व आगरव्यवस्थापकांना चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विभाग नियंत्रकानी आगर व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माघवारीसाठी जाणा-या भाविक वर्गाचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्याच्या दृष्टिने मार्गावर जाणा-या चालक वाहक यांना उचित सुचना देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे, भाविक वर्ग व प्रवासी वर्ग यांच्याशी नम्रपणे वागून सौदार्हपुर्ण संबध ठेवण्याबाबत त्यांना सुचना देण्यात याव्यात.
वारक-यांसाठी प्रत्येक बसमध्ये २४ प्रौढ व २० जेष्ठ नागरिक असे एकुण ४४ आसनांचे बुकिंग देण्यात यावे. देण्यात येणा-या गाड्या स्वच्छ व सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांचे सामान ठेवण्यासाठी बसला सुस्थितीत लगेज कॅरिअर असल्याची खात्री करावी. शक्यतो पंढरपुरला जातेवेळी असलेले चालक, वाहक येतेवेळीही देण्यात यावेत. असेही म्हटले आहे.
दरम्यान, एसटीकडून चांगल्या सुविधा मिळणार असल्याने वारकरी संप्रदयातर्फे विभाग नियंत्रकांचे आभार मानण्यात आले.