नायलॉनच्या जाळीत अडकले दुर्मिळ खवले मांजर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका
By अनंत खं.जाधव | Published: August 29, 2022 04:22 PM2022-08-29T16:22:12+5:302022-08-29T16:44:56+5:30
घराशेजारील अंगणात नायलॉनच्या जाळीत अडकले होते खवले मांजर
सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथे नायलॉनच्या जाळीत दुर्मिळ खवले मांजर अडकल्याचे आढळून आले. याबाबत शेतकरी सखाराम राणे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर दोडामार्ग वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खवले मांजरास ताब्यात घेतले. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. खवलेमांजराची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असतना राणे यांच्या प्रामाणिकपणामुळे खवले मांजर जीवदान मिळाले.
उगाडे येथील शेतकरी सखाराम राणे यांच्या घराशेजारील अंगणात खवले मांजर नायलॉनच्या जाळीत अडकले होते. राणे यांच्या ते निदर्शनास येताच त्यांनी दोडामार्ग वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. अन् नायलॉनच्या जाळीत अडकलेल्या खवले मांजराची सुटका केली. पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी त्यास वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. तेथे त्याची वन पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे खवलेमांजर पुर्णतः निरोगी असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
कोकणातील या दुर्मिळ अशा वन्यजीवाची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असते. मात्र राणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे वनविभागाने त्यांचे आभार मानून बक्षीस देखील दिले. यावेळी वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनमजुर विश्राम कुबल, नारायण माळकर आदी उपस्थित होते.