कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:52 IST2021-07-02T19:51:15+5:302021-07-02T19:52:48+5:30
leopard Forest Department Sindhudurg : कळसुली परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली असून बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कळसुली दिंडवणेवाडी येथील अरविंद शिंदे यांच्या घरासमोरील अंगणातून झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. चाहूल लागताच घरातील माणसे अंगणात आली. परंतु, त्याआधीच त्याने कुत्र्याला घेऊन पोबारा केला होता.

कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण
कनेडी : कळसुली परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली असून बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कळसुली दिंडवणेवाडी येथील अरविंद शिंदे यांच्या घरासमोरील अंगणातून झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. चाहूल लागताच घरातील माणसे अंगणात आली. परंतु, त्याआधीच त्याने कुत्र्याला घेऊन पोबारा केला होता.
अरविंद शिंदे यांच्या अंगणाच्या बाजूला लागूनच गोठा असल्याने गुरांनाही बिबट्यापासून धोका आहे. या प्रसंगामुळे कळसुली दिंडवणेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंडवणेवाडी आणि आजूबाजूचा परिसर हा डोंगराच्या पायथ्याशी येत असून या परिसरातच कळसुली गावातील धरण आहे. त्यामुळे अनेकदा येथे जंगली प्राण्यांचा वावर लोकवस्तीतूनही दिसून येतो. वनविभाग या समस्येकडे लक्ष देणार आहे का? की मनुष्यहानी झाल्यावरच वनविभागाचे डोळे उघडणार आहेत, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अंगणातील कुत्र्याची केली शिकार
या भागात तीन चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर अनेकदा दिसून आला आहे. कित्येकांना गुरे चारायला घेऊन गेल्यावर त्याच्या पाऊलखुणा आणि पुसटसे दर्शनही झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी याच वाडीतील गावकर यांच्या गायीवरही बिबट्याने झडप घालायचा प्रयत्न केला होता. तसेच अजून दोघांच्या अंगणातील कुत्र्यांची शिकार केली होती. जंगली भागातील हा बिबट्या लोकवस्तीत घुसू लागल्याने आता नागरिकांत चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.