पथकाच्या अहवालानंतर केंद्राकडे भरघोस पॅकेज मागणार : पंकजा मुंडे
By Admin | Published: August 13, 2015 12:08 AM2015-08-13T00:08:25+5:302015-08-13T00:25:09+5:30
लातूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. आता हे पथक आपला अहवाल केंद्र शासनाला देईल.
लातूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. आता हे पथक आपला अहवाल केंद्र शासनाला देईल. आम्ही या पथकामार्फत केंद्र शासनाकडे मराठवाड्यातील दुष्काळाविरुद्धच्या लढाईसाठी भरघोस पॅकेजची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी सांगितले. त्या पाहणी दौऱ्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
त्यांनी सुरुवातीला लातूर तालुक्यातील महापूर येथील बालाजी शिंदे यांच्या शेतात जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची व किसन रणखांब यांच्या वाळलेल्या ऊसाची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील विश्वजित कदम यांची डाळींब बागही पाहून घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मराठवाड्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. यासाठी केंद्रीय पथक पाहणी करीत आहे. या पथकाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही दुष्काळाच्या स्थितीबाबत बैठक घेऊन चर्चाही केली. परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. या पथकाचा अहवाल केंद्राला गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत.
चारा आणि पाणी या दोन समस्या मोठ्या आहेत. त्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. चारा छावणीसंबंधीचा निर्णय झाला आहे, त्याची तातडीने अंमलबजावणीही होईल. आता शेतकऱ्यांना बळ देण्याची गरज आहे. यासाठी सरकार पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जि.प.चे सीईओ दिनकर जगदाळे, एसडीओ प्रताप काळे, कृषी अधिकारी मोहन भिसे, तहसीलदार अजित कारंडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)