परशुराम उपरकर यांना जामीन मंजूर
By admin | Published: May 28, 2014 01:07 AM2014-05-28T01:07:47+5:302014-05-28T01:35:27+5:30
सरकारी कामात अडथळा प्रकरण
सिंधुदुर्गनगरी : मालवणचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गजानन मातोंडकर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी आमदार व मनसेचे नेते परशुराम उपरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने रोख २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. उपरकर यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई व अॅड. राजन शिरोडकर यांनी काम पाहिले. ३ मार्च २००८ रोजी दुपारी २.३० वाजता शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आलेल्या परशुराम उपरकर यांनी तहसील कार्यालयातील गेटवर कोणतीही आगाऊ सूचना न देता जमावासह आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस अधिकारी गजानन मातोंडकर यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपरकरांसह गोवेकर आणि लुडबे यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सस्पेंड करण्याची आणि अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणू अशी धमकी दिली. या प्रकरणी मातोंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान वरील तीनही आरोपींना प्रत्येकी एक वर्षाची साधी कैद आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात वरील तिघांनीही येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने गोवेकर व लुडबे यांना निर्दोष मुक्त केले तर उपरकर यांना दोषी ठरवत एक महिना साधी कैद आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, उपरकर यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी वकीलाद्वारे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार उपरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने रोख २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन भरून घेण्याची पूर्तता मालवण न्यायालयात होणार आहे. (प्रतिनिधी)