परप्रांतीय मच्छिमारांकडून हर्णैत बोटीवर दगडफेक
By admin | Published: February 19, 2015 09:47 PM2015-02-19T21:47:17+5:302015-02-19T23:50:04+5:30
श्रीवर्धनजवळ कर्नाटक राज्यातील काही बोटी मासेमारी करीत असल्याचे आढळले.
दापोली : परप्रांतीय पर्ससीननेट व स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्यात संघर्ष पेटला असून, गुरुवारी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या काही स्थानिक बोटींवर परप्रांतीय मच्छिमारांनी दगडफेक केली. यात तीन बोटींच्या काचा फुटल्या असून, विश्वास वरवटकर (दापोली) याच्यासह अन्य एक खलाशी जखमी झाला आहे. त्यामुळे परप्रांतीय मच्छिमारांविरोधात स्थानिक मच्छिमारांमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.परप्रांतीय बोटींना अटकाव करण्यासाठी हर्णै बंदरात दोन दिवस बोटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परप्रांतीय बोटींना अटकाव करण्यासाठी स्थानिक मच्छिमार एकटवले होते. परप्रांतीय बोटींना पळवून लावण्यासाठी हर्णै येथील २०० बोटी रविवारी समुद्रात गेल्या होत्या. त्या दिवशी श्रीवर्धनजवळ कर्नाटक राज्यातील काही बोटी मासेमारी करीत असल्याचे आढळले. मोठ्या संख्येने येणाऱ्या स्थानिक मच्छिमार बोटी दिसताच काहींनी पळ काढला. मात्र, एक परप्रांतीय बोट स्थानिक मच्छिमारांच्या हाती लागली. (प्रतिनिधी)