आंदोलनावर पालक ठाम

By admin | Published: June 21, 2016 12:43 AM2016-06-21T00:43:02+5:302016-06-21T01:19:19+5:30

उपोषण लांबणीवर : सावंतवाडी मिलाग्रीसमधील शिक्षक बदलीप्रकरण

Parents on the agitation | आंदोलनावर पालक ठाम

आंदोलनावर पालक ठाम

Next

सावंतवाडी : येथील मिलाग्रीसच्या मराठी प्रायमरी स्कूलचे शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द करा, या मागणीसाठी पालकांनी मंगळवारपासून पुकारलेले उपोषण पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केली होती. त्याला पालकांनी योग्य प्रतिसाद देत उपोषण पुढे ढकलू, मात्र शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले.
मिलाग्रीस प्रायमरीचे शिक्षक दिनेश खोत यांच्या बदलीवरून उद्भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलिस निरीक्षक शंकर पाटील, तहसीलदार सतीश कदम, माजी आमदार राजन तेली यांच्यासह पालक व संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. मनवेल डिसिल्व्हा आदी उपस्थित होते.
या बैठकीत अ‍ॅड. डिसिल्व्हा यांनी संस्थेची बाजू मांडली. यात संस्थेला शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द करता येणार नाही. यापूर्वीही अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, असा खुलासा केला. तसेच शिक्षक खोत यांनी बदली रद्द करण्यासाठी न्यायालयात जावे, अशी सूचना केली. यावर पालकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत शिक्षक खोत यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रांताधिकारी इनामदार व तहसीलदार कदम यांनी संस्थेची भूमिका मांडत असताना तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार करा, असा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना जर शाळेत पाठवले नाही, तर तुम्ही शिकवणार कोणाला, असा सवाल करीत शिक्षक खोत यांच्या बदलीबाबत तोडगा काढा. तुम्ही बदलीला स्थगिती तरी द्या अन्यथा बदली रद्द करा, असा पर्याय संस्थेसमोर ठेवला. शिक्षक बदलीवरून कायदा सुव्यवस्था बिघडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन म्हणून आमचे ते काम आहे. त्यामुळे वेळीच निर्णय घ्या, अशी सूचना त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
त्यावर अ‍ॅड. मनवेल डिसिल्व्हा यांनी बदली रद्द करण्याबाबतचा विषय संचालकांचा आहे. तो आम्ही आता घेऊ शकत नाही. आम्हाला तीन दिवसांचा कालावधी द्या, अशी विनंती प्रांताधिकाऱ्यांकडे केली. त्यावर प्रांताधिकारी यांनी पालकांशी चर्चा करत आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली. यावर उपोषण पुढे ढकलू मात्र, मुले पाठविण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे पालकांनी स्पष्ट केले. मात्र, यावर संस्थेच्या शिक्षिका अनिता गावडे यांनी आक्षेप घेतला. तुम्ही मुले पाठवा, निर्णय लवकर होईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण पालकांनी याला विरोध केला.
या बैठकीला पालकांच्यावतीने प्रथमेश चोडणकर, गुरूनाथ घाडी, अन्नपूर्णा कोरगावकर, प्रणिती वर्तक, शहरअध्यक्ष आनंद नेवगी, विराग मडकईकर, भाऊ पोकळे, सद्गुरू पिळणकर, निशांत तोरस्कर, नरेंद्र मिठबावकर, अशोक बोलके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


राजन तेली : ...अन्यथा आंदोलनाचे नेतृत्व मी करेन

माजी आमदार राजन तेली यांनी संस्थेने योग्य ती भूमिका घ्यावी. आम्ही संस्था पदाधिकाऱ्यांचा आदर करतो. त्यांनी पालकांचा अनादर करू नये. अन्यथा आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा दिला. तसेच पालक शांत आहेत याचा कोणी गैरअर्थ काढू नये. अन्यथा पालकांच्या आंदोलनात मी स्वत: सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व करेन, असा इशाराही तेली यांनी यावेळी दिला.

‘त्या’ शिक्षकाला हजर करून घेण्याचा प्रयत्न
मराठी प्रायमरीचे शिक्षक खोत यांची मालवणला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बारदेस्कर या शिक्षकाची मालवण येथून सावंतवाडीत बदली झाली आहे. त्यांना तातडीने हजर करून घेण्यात यावे, असा तगादा संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मराठी शाळेच्या सिस्टरकडे लावला आहे. मात्र, त्याला पालकांनी तीव्र विरोध केला.

Web Title: Parents on the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.