ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी पुकारले उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 PM2021-02-24T16:24:54+5:302021-02-24T16:27:03+5:30
online Education Konkan- आंबोली सैनिक स्कूल, आंबोली यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्कूलमध्ये ज्यांचे पाल्य शिकत आहेत. त्यांचे पालक गेले महिनाभर मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात यावे, यासाठी शाळेकडे वारंवार विनंत्या करत होते. परंतु शाळेकडून फीची मागणी होत होती. त्यामुळे पालक आम्ही फी भरू, परंतु शिक्षण ऑनलाईन सुरू करा, असे सांगत होते. तरीही ऑनलाईन शिक्षण बंद ठेवण्यात आल्याने पालकांनी शाळेच्या गेट समोरच आमरण उपोषण पुकारले.
आंबोली : आंबोली सैनिक स्कूल, आंबोली यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्कूलमध्ये ज्यांचे पाल्य शिकत आहेत. त्यांचे पालक गेले महिनाभर मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात यावे, यासाठी शाळेकडे वारंवार विनंत्या करत होते. परंतु शाळेकडून फीची मागणी होत होती. त्यामुळे पालक आम्ही फी भरू, परंतु शिक्षण ऑनलाईन सुरू करा, असे सांगत होते. तरीही ऑनलाईन शिक्षण बंद ठेवण्यात आल्याने पालकांनी शाळेच्या गेट समोरच उपोषण पुकारले.
यावेळी पालकांनी सांगितले की, वर्षभर शाळा बंद असताना पूर्ण फी कशी भरायची आणि शासनाने आदेश दिलेले आहेत की, शाळांच्या फीमध्ये सवलत देण्यात यावी, असे असतानाही तिचा तगादा का लावण्यात येत आहे. शिवाय शासनाकडून ऑनलाईन शिक्षणाचा आदेश असतानाही शाळेकडून शिक्षण बंद का करण्यात आले. याबाबत जाब विचारण्यासाठी म्हणून आज ३० ते ३५ पालक मुंबई तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सैनिक स्कूल येथे आले होते. सकाळी त्यांनी आंदोलन सुरू केले.
पालकांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऑनलाईन फी देऊ शकतो. परंतु वर्षभराची फी आम्ही का म्हणून द्यायची, असा सवाल करण्यात आला. वर्षभर शाळा बंद असताना कोणताच खर्च आमच्या पाल्यावर झालेला नाही मग फी कसली द्यायची, असाही प्रश्न केला. याबाबत आंबोली पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांनी उपोषणस्थळी येत विनंती केली. तहसीलदार यांच्या शब्दाचा मान ठेवत पालकांनी २६ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी भेटण्याचे कबूल केले.
तहसीलदारांची मध्यस्थी
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तहसीलदार राजाराम मात्रे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेतून पालक व सैनिक स्कूलचे संचालक मंडळ यांच्यात चर्चा घडवून आणून योग्य तो पर्याय काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी उपोषण मागे घेतले.