पालकांचाही ‘संवाद निसर्गाशी’
By admin | Published: April 2, 2015 09:20 PM2015-04-02T21:20:55+5:302015-04-03T00:46:42+5:30
वेंगुर्लेत आयोजन : ‘मुक्तांगण’चा स्नेहमेळावा उत्साहात
वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील मुक्तांगण बालविकास प्रकल्प, मुक्तांगण महिला मंच व परुळेकर गुरूकुल यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे ‘मुक्तांगण स्नेहमेळावा २०१५’ चे आयोजन मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमात वर्षभर मुक्तांगणमध्ये राबविले जाणारे उपक्रम व प्रकल्प मांडण्यात आले होते. तसेच बालकांना गृहपाठ न देता पालकांना ‘संवाद निसर्गा’शी हा गृहपाठ दिला होता.
या कार्यक्रमात मुलांनी आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. परुळेकर गुरुकुलच्या ऋतुजा गावडे व गौतम शिरसाट यांनी मयूरनृत्य सादर केले. यावेळी विविध कौशल्यावर आधारित यश प्राप्त केलेल्या मुलांना व पालकांना गौरविण्यात आले. तसेच मुलांना शाळेत घेऊन येणारे रिक्षावाले व आजी-आजोबा यांचाही सत्कार करण्यात आला. मुक्तांगणच्या सहशिक्षिका गौरी माईणकर, स्वाती मिशाळे, गीतांजली करंगुटकर यांचा कैवल्य पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शाम नाडकर्णी व आशिष नरसुले यांनी केले. मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर यांचे सूत्रबद्ध नियोजन केले. राणी माईणकर यांनी अहवालवाचन केले. आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले. या स्नेहमेळाव्याला विविध संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ, महिला मंडळे, शिक्षिक -शिक्षिका व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)