मुलासाठी आई-वडिलांची दाहीदिशा
By Admin | Published: November 22, 2015 11:27 PM2015-11-22T23:27:09+5:302015-11-23T00:03:22+5:30
दोडामार्गमध्येच सापडला : पोलिसांनी जंगल पिंजून काढले
कसई दोडामार्ग : अंगावर कोणतेही वस्त्र नसताना वर्षाच्या मुलाने रात्र जंगलात काढल्याची घटना मंगळवारी दोडामार्ग येथे घडली. मुलगा अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या मजूर कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनीही मुलाच्या शोधासाठी जंगल परिसर पिंजून काढला. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर बुधवारी येथील पेट्रोल पंपाजवळ मुलगा आढळून आला आणि पोलिसांसह सर्वांनीच मोकळा श्वास घेतला.
कर्नाटक विजापूर येथून मोलमजुरीसाठी काही कामगार सहकुटुंब दोडामार्ग येथे दाखल झाले आहेत. यापैकीच एक सदाशिव मादर. मंगळवारी सायंकाळी त्यांची पत्नी दोडामार्गपासून जवळच असलेल्या कालव्याच्या नाल्याजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत चार वर्षांचा श्रीकांतही होता. कपडे धुवून झाल्यानंतर ती पुन्हा झोपडीकडे परतली. मागून मुलगा येतोय, असे समजून तिने मागे वळूनही पाहिले नाही. घरी आल्यानंतर तिने पाहिले तर मागे मुलगा नव्हताच. तिने पुन्हा नाल्याजवळ धाव घेत तिथे शोधाशोध केली. तेथेही तो न आढळून आल्याने घाबरलेल्या मजूर कुटुंबाने दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनीही तेथील जंगल परिसर पिंजून काढला. कालव्यानजीकही शोध घेतला. पणसर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. श्रीकांत कोठेही आढळून आला नाही.
अवघे चार वर्षांचे पोर. अंगावर कपडाही नाही आणि रात्रभर जंगलात. थंडीचे दिवस. हिंंस्र प्राण्यांची भीती. या आणि अशा अनेक विचारांनी आईवडिलांची पाचावर धारण बसली. संपूर्ण रात्र जागवून काढली.
अखेर बुधवारी सकाळी येथील एका पेट्रोलपंपाच्या मागे हा मुलगा रडत असताना तेथाील कामगारांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला पालकांच्या स्वाधीन केले.
अंगावर एकही कपडा नसताना, जंगली श्वापदांची भीती असताना पूर्ण रात्र जंगलात काढलेला चार वर्षांचा बालक सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय ठरला असून, बुधवारी दिवसभर या घटनेची परिसरात चर्चा
होती. (वार्ताहर)