परप्रांतीय महिलेच्या विनयभंगाची चर्चा?

By admin | Published: February 28, 2016 12:02 AM2016-02-28T00:02:07+5:302016-02-28T00:02:07+5:30

हेत पंचक्रोशीतील घटना : तीन दिवसांपूर्वी तक्रार; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ?

Parineeti woman's molestation talk? | परप्रांतीय महिलेच्या विनयभंगाची चर्चा?

परप्रांतीय महिलेच्या विनयभंगाची चर्चा?

Next

वैभववाडी : हेत पंचक्रोशीत परिसरातीलच तरुणाने परप्रांतीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. त्याबाबत पीडित परप्रांतीय महिलेने तीन दिवसांपूर्वी भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे. परंतु तक्रार देऊन तीन दिवस उलटले तरी पीडित महिला परप्रांतीय कामगार असल्याने पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवला नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेत परिसरात शासनामार्फत सुरु असलेल्या एका मोठ्या कामावर ती महिला कामगार असल्याचे समजते. त्याच परिसरातील तरुणाने त्या महिलेला रस्त्यावर अडवून विनयभंग केला. त्यादिवशी त्या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रात विनयभंगाची तक्रार दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. परंतु दूरक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा न नोंदवता संशयितास बोलावणे धाडले होते.
कथित विनयभंग प्रकरणातील संशयित शुक्रवारी सकाळी दूरक्षेत्रात हजर न झाल्याने पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी दोनदा संशयिताच्या घरी जाऊन आले, अशी त्या गावात जोरात चर्चा सुरू आहे. तक्रारदार पीडित कामगार महिला परप्रांतीय असल्याने हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच तक्रार दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत भुईबावडा पोलीस दूरक्षेत्रातील सहाय्यक उपनिरीक्षक एम. व्ही. चौकेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्या महिलेची ‘शिविगाळी’ची तक्रार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पीडित महिला परप्रांतीय असल्याचा फायदा संशयिताला वाचविण्यासाठी उठवला जात असल्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
वैभववाडी पोलीस अनभिज्ञ..!
४हेत पंचक्रोशीतील कथित विनयभंगाच्या तक्रारीबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, गेल्या दोन तीन दिवसात तालुक्यात अशाप्रकारची महिलेची तक्रारच नसल्याचे सांगितले जाते. वैभववाडीपासून सुमारे २0 किमी अंतरावर भुईबावडा पोलीस दूरक्षेत्र आहे. दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र दुर्गम असल्याने वेगवेगळ्या प्रकारची कित्येक गंभीर प्रकरणे वैभववाडीपर्यंत न आणता दूरक्षेत्रातील पोलीस परस्पर दडपून टाकत असल्याची चर्चाही याप्रकरणाच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Parineeti woman's molestation talk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.