पारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:41 PM2020-07-02T15:41:39+5:302020-07-02T15:43:31+5:30
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.
कणकवली : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.
संदेश पारकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला नलावडे यांनी उत्तर दिले. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हावासीय कोरोनापासून दूर रहावेत यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अनेक उपक्रम व उपाययोजना राबविल्या. जिल्हावासीयांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी प्रशासनाला सूचनाही केल्या. साहित्य वाटप हे सर्व नीतेश राणे यांनी स्वखर्चातून केले.
राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गाला एकही दमडी देत नसताना नीतेश राणे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली. पण सत्ताधारी पक्षात असलेले पारकर हे जनतेच्या काळजीपेक्षा आपल्या बैठकांमध्ये मग्न होते. त्यांच्या बैठका कुठे चालायच्या ते कणकवली शहरातील जनता जाणते. त्यामुळे राणेंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून पारकर यांचा हा खटाटोप सुरू आहे.
पारकर यांनी गेल्या अडीच महिन्यात असा कोणता सामाजिक उपक्रम राबविला किंवा कोरोनाला रोखण्यासाठी काय केले ते जाहीर करावे. शिवसेनेच्या नेत्यांच्या पदराआड राहून प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोरोना काळात जनतेचे हित जपण्यापेक्षा स्वत:च्या हिताचा जास्त विचार पारकर यांनी केला.
ज्या कणकवली शहरातील जनतेने त्यांना सरपंच ते नगराध्यक्षपदापर्यंत पदे दिली त्या जनतेसाठी पारकर यांनी आतापर्यंत काय केले ? साधे मास्क वाटपही स्वखर्चातून त्यांना करता आले नाही. किंवा शासनामार्फतही कोणताही निधी कोरोना उपाययोजनांसाठी पारकर यांनी आणला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पारकरांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे चुकीचे
कोरोनाच्या काळात पारकर कणकवली शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पारकर यांच्या मनात शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते. अशा स्थितीत पारकर यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे ही चुकीचेच आहे, असेही नलावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.