निवती समुद्रात पर्ससीनचा धुमाकूळ
By Admin | Published: July 18, 2016 11:18 PM2016-07-18T23:18:17+5:302016-07-19T00:19:48+5:30
बंदी असतानाही मासेमारी : पारंपरिक मच्छिमार संतप्त; मत्स्य विभागाकडे कडक कारवाई करण्याची मागणी
मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर मासेमारी बंदी असतानाही निवती-कोचरा येथील मिनी पर्ससीनधारकांनी अनधिकृत मासेमारी सुरू केली आहे. शासनाने घातलेले निर्बंध झुगारून पर्ससीन मासेमारी करत असल्याने या कालावधीत तयार होणारे मत्स्यबीज तसेच लहान-मोठी मासळीची लूटमार सुरू केली आहे. किनारपट्टीवरील भागात मासेमारी सुरू राहिल्यास पारंपरिक मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाने अनधिकृत मासेमारीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विभागाचे प्रदीप वस्त यांनी प्रभारी सहायक मत्स्य आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पारंपरिक मच्छिमारांनी भेट घेत बंदी कालावधीत समुद्रात सुरू असलेल्या मासेमारीबाबत कल्पना देताना कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विकी तोरसकर, सन्मेश परब, गंगाराम आडकर, बाबी जोगी, आदी मच्छिमार उपस्थित होते. यावेळी तोरसकर यांनी ड्रोन प्रणालीबाबतही माहिती देताना शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली.
जिल्ह्यात ४० अधिकृत पर्ससीन आहेत. मात्र, शासनाच्या नव्या धोरणानुसार परवानाधारक पर्ससीन सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र किनारपट्टीवर साडेबारा वाव क्षेत्राच्या बाहेर मासेमारी करू शकतात, तर उर्वरित हंगामात शासनाच्या अटी-शर्थीनुसार १२ सागरी नॉटिकल क्षेत्राबाहेर मासेमारी करू शकतात. असे असताना मासेमारी बंदी कालावधीत पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पारंपरिक मच्छिमार समुद्र्री मत्स्य बीज वाढीसाठी प्रयत्नशील असताना ही अनधिकृत मासेमारी मासळीसोबत मत्स्यबीज उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने कडक कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी मच्छिमारांनी केली.
आता शासनाने काही महिन्यांपूर्वी किनारपट्टीवरील बंदरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. मात्र, राजरोसपणे
अनधिकृत मासेमारी चालते, त्या निवती बंदरात सुरक्षा रक्षक नसल्याने पारंपरिक मच्छिमार आक्रमक झाले होते. याबाबत सोमवारीही प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी तेरोखोल बंदरातील सुरक्षा रक्षक निवती बंदरात नियुक्त करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या काही दिवसांत तो मंजूर होईल, असे मत्स्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(छायाचित्र पान १0)
पारंपरिक मच्छिमारांना न्याय देताना पदाची चिंता न करता नियमबाह्य व अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जाईल.
- प्रदीप वस्त, प्रभारी सहायक मत्स्य आयुक्त