महामार्ग बॉक्सवेलचा काही भाग धोकादायक, कणकवलीतील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:45 AM2020-06-22T10:45:21+5:302020-06-22T10:46:33+5:30
कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
कणकवली : शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या बाजूने होणारी वाहतूक तातडीने बंद करून ती एकाच बाजूने वळविण्याची सूचना तहसीलदार आर. जे. पवार यांनी पोलिसांना केली. त्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली.
पहिल्याच पावसात बॉक्सवेलची झालेली ही दुरवस्था लक्षात घेता दिलीप बिल्डकॉनच्या महामार्ग कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कणकवली शहरात दिलीप बिल्डकॉन गेली चार वर्षे महामार्गाचे काम करीत आहे. त्यात अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार स्पष्ट दिसून आला आहे.
यापूर्वी अशा कारभारामुळे नागरिकांकडून उग्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तरीही निकृष्ट कामाची पुन्हा पुन्हा प्रचिती येत आहे. शहरातील गांगो मंदिर आणि एस. एम. हायस्कूल ही नेहमीच रहदारीची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणीच उभारण्यात आलेली भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शनिवारी सकाळी काही जागरूक नागरिकांनी तहसीलदार आर. जे. पवार यांना संबंधित स्थितीची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पाहणी करून त्या बाजूची वाहतूक पोलिसांना बंद करायला लावली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता गणेश महाजन यांना भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली. तसेच दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत कळविले.