अर्धवट प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण!

By admin | Published: June 5, 2016 10:36 PM2016-06-05T22:36:25+5:302016-06-06T00:52:22+5:30

दीपक केसरकर : ओरोस येथील कार्यशाळा उत्साहात; सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

Partial completion of the project year! | अर्धवट प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण!

अर्धवट प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण!

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविताना मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग सर्वांगीण विकास असलेला जिल्हा बनविणे हेच माझे ध्येय आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट राहिलेले प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी शरद भवन येथील कार्यशाळेत केले. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे रविवारी चांदा ते बांदा आराखडा, कोकण ग्रामीण विकास पर्यटन आराखडा सादरीकरण, माझं गावं माझा विकास योजना सादरीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, आमदार वैभव नाईक, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, रचना संसद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस, चांदा ते बांदाच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य लीना बनसोड, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, बबन साळगावकर, सभापती सुचिता वजराठकर, शुभांगी पवार, रवींद्र जोगल, माजी आमदार प्रमोद जठार, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच, आदी ८०० जण उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, पर्यटन व शेती समृद्धीतून आपल्याला आर्थिक विकास साधावयाचा आहे. दरडोई उत्पन्नात जिल्हा पुढारलेला आहे असे म्हणताना जिल्ह्यातील ४० हजार दारिद्र्यरेषेखालील जनता विसरून चालणार नाही. म्हणून केवळ पर्यटन नाही, तर शेतीतूनही जिल्हा समृद्ध झाला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. वरील चारही योजनांच्या सादरीकरणाचा सर्वांनी सर्व दृष्टिकोनातून विचार करावा व आपला गाव आदर्श पर्यटन गाव करण्याचा प्रयत्न करावा आणि आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले, सिंधुदुर्गासाठी हा सुवर्णक्षण आहे. असे सांगून विकास आराखड्याच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहेत. त्याचा तेथील ग्रामस्थांनी फायदा करून घ्यावा. मात्र, पर्यटनस्थळांची जाहिरात करताना फसवेगिरी असू नये, असेही ते म्हणाले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. सिंधुदुर्गातील रोजगाराची कमतरता हेच कारण प्रामुख्याने पुढे येते. म्हणून या माध्यमातून रोजगार वाढल्यास येथील जनता पुन्हा स्थिरावेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व रचना संसदचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस यांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांचे लाड आता खूप झाले
कार्यशाळा सुरू झाली आणि सभागृहात विजेचा लपंडाव सुरू झाला. बंदिस्त सभागृहात उपस्थित कासावीस व्हायला लागले. त्यावेळी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या विशेष कार्यशाळेच्या कार्यक्रमात असा हलगर्जीपणा करणे हे योग्य नसून या अधिकाऱ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. गेल्या दीड वर्षात अधिकाऱ्यांचे खूप लाड केले. मात्र, यापुढे तसे लाड न करता काम करा, अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यात बदलीसाठी तयार व्हा, असा सज्जड दमही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

Web Title: Partial completion of the project year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.