जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी व्हा
By admin | Published: February 1, 2017 12:35 AM2017-02-01T00:35:33+5:302017-02-01T00:35:33+5:30
दीपक केसरकर यांचे आवाहन : महिला ढोलपथकाची शोभायात्रा ठरली आकर्षण, व्यापारी मेळावा उत्साहात
वैभववाडी : आपल्या व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन निर्माण करुन व्यापाऱ्यांनी जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी झाले पाहिजे. त्याचबरोबर चाकोरीबद्ध पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडून शासनाच्या योजनांचा लाभ घेत नवे उद्योगधंदे उभारण्यासाठी पुढाकार घेऊन स्थानिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करतानाच जिल्ह्याच्या व्यापारवृध्दीत कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यापारी एकता मेळाव्यात दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या २९ व्या व्यापारी एकता मेळाव्याला शोभायात्रेने सुरुवात झाली. तर पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते एकता मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे शंतनू भडकमकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, सभापती शुभांगी पवार, नगराध्यक्ष संजय चव्हाण, सारस्वत बँकेचे अनिल सौदागर, अरविंद नेवाळकर, मुख्याधिकारी सचिन बोरसे, वैभववाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, जिल्हा महासंघाचे सहकार्यवाह संजय सावंत, स्वागताध्यक्ष संजय लोके, रविराज जाधव, नितीन वाळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, एकता मेळाव्यातून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या एकतेचे दर्शन घडते. व्यापाऱ्यांनी जीएसटीचे स्वागत केले पाहिजे. व्यापारात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसायाच्या मार्केटिंगचे तंत्र अंगिकारण्याची गरज आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या एकतेचे दर्शन महाराष्ट्राला अनेकदा झाले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करून सचोटीने व्यापार करणारा जिल्हा अशी राज्यात सिंधुदुर्गची ओळख आहे. ही शक्ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरावी, असे आवाहन केसरकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी गृहमंत्री असलो तरी आधी व्यापारीच होतो. त्यामुळे व्यापारी बांधवाच्या भावना, व्यवसायात येणाऱ्या अडचणींची आपल्याला चांगली जाण आहे. व्यापाराशी निगडीत अर्थ खातेही माझ्याकडेच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात नवनव्या उद्योग विकासाच्या योजना येऊ घातल्या आहेत. त्यांचा लाभ जिल्ह्यातील लोकांनी घेतला पाहिजे. न्याहारी-निवास योजनेसाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढे येऊन स्थानिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अन्यथा, कोकणातील माणसांच्या अर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्याा 'चांदा ते बांदा' सारख्या योजनांचा लाभ परप्रांतीय लोक उठविल्याशिवाय राहणार नाहीत असेही केसरकर म्हणाले.
आमदार नीतेश राणे म्हणाले की, व्यापाऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करुन त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार व आमची आहे. व्यापाऱ्यांसाठी पुढचा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आर्थिक समृद्धीत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी व्यापाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे. नोटाबंदीचा निर्णय चांगला की वाईट हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण 'कॅशलेस' व्यवहारासाठी व्यापाऱ्यांना सुविधा निर्माण करुन देण्याची जबाबदारी सरकारचे मंत्री म्हणून केसरकरांची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवतानाच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करु.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडताना कॅशलेसची सक्ती ठीक आहे. परंतु, त्यातून गरीब आणि शेतकऱ्यांना तूर्तास वगळले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दिगंबर सावंत यांना जीवनगौरव, शेवंता साळवी यांना महिला उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. राजेंद्र पाताडे, संतोष टक्के यांनी सुत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)