फायद्यातील प्रकल्प वाचविण्यासाठी विभाजन?

By admin | Published: September 17, 2016 10:52 PM2016-09-17T22:52:33+5:302016-09-18T00:03:04+5:30

रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्प : गॅस टर्मिनल फायद्यात, वीज निर्मिती तोट्यात

Partition to save the benefits project? | फायद्यातील प्रकल्प वाचविण्यासाठी विभाजन?

फायद्यातील प्रकल्प वाचविण्यासाठी विभाजन?

Next

गुहागर : वीज निर्मिती प्रकल्पाच्या तोट्यामुळे एलएनजी प्रकल्पातून होणारा फायदा कमी होत असल्यानेच रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या दोन कंपन्या करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. तोट्यात असलेला वीज निर्मिती प्रकल्प येत्या काही काळातच बंद करण्यासाठीच वीज निर्मिती आणि गॅस टर्मिनल, अशा दोन कंपन्या करण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रावरील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी गाळात गेलेला दाभोळ वीज प्रकल्प आॅक्टोबर २००५ मध्ये ‘रत्नागिरी गॅस अँड विद्युत प्रकल्प’ असे नाव देऊन सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. एनटीपीसी, गेल, तत्कालीन वीज मंडळ व काही राष्ट्रीयीकृत बँकांना एकत्रित घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित केला. या वीज प्रकल्पाची २१०० मेगावॅट इतकी वीज निर्मितीची क्षमता आहे. काही वर्षांनी सरासरी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली. मात्र, गॅसचे दर वाढविल्यानंतर गॅसपुरवठा थांबला. तेथून या प्रकल्पाला पुन्हा ग्रहण लागले. वर्षभर काही फरकाने वीज निर्मिती सुरू राहिली. पण, गॅसची उपलब्धताच होत नसल्याने वीज निर्मिती बंद ठेवण्याची वेळ आली.
नव्याने आलेल्या सरकारने या प्रकल्पात लक्ष घालत रेल्वेसाठी ५०० मगोवॅट वीज निर्मितीचा करार करून दिल्याने गेले काही महिने या प्रकल्पाला दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या सद्य:स्थितीचा विचार करता वीज निर्मिती केंद्राचे भवितव्य आजही अंधारात आहे. रेल्वेकडून मार्च २०१७ पर्यंत वीज घेतली जाणार आहे. त्यापुढील काळात या प्रकल्पातील महागडी वीज कोण घेणार? हा प्रश्न पुन्हा उभा राहणार
आहे. याउलट एलएनजी प्रकल्प फायद्यामध्ये आहे. गॅसची मागणी वाढली असल्यामुळे हा प्रकल्प पुढे आणखी काही वर्षे सुरूच राहील. मात्र, या प्रकल्पातून मिळणारा फायदा रत्नागिरी गॅस प्रकल्पात खर्च होत आहे. हे दोन्ही विभाग वेगवेगळे काम करीत असले तरी प्रशासन मात्र एकच आहे. वीज निर्मितीला मागणी नसल्यास भविष्यात हा प्रकल्प वेळ आली, तर त्याच्यासोबत फायद्यात असलेला एलएनजी प्रकल्पही बंद पडेल. तो जर वेगळा कार्यरत राहिला तर भविष्यातही तो सुरू राहील. त्यामुळेच या दोन स्वतंत्र कंपन्या करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
(प्रतिनिधी)

दोन प्रकल्पांमुळे क्षमता वाढेल...
सद्य:स्थितीत एलएनजी प्रकल्पासाठी १५ हून अधिक लिक्विड गॅसची जहाजे परेदशातून येत आहेत. आगामी काळात जेटीजवळ प्रस्तावित ब्रेक वॉटरचे काम सुरू होणार असल्याने पावसाळ्यातील उच्च भरती काळातही जहाजे येथे दाखल होतील आणि या प्रकल्पाची क्षमता वाढेल. एलएनजी प्रकल्पामध्ये येणाऱ्या लिक्विड गॅसवर आवश्यक प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी उपयुक्त, असा गॅस बनविला जातो. या गॅसला मोठी मागणी आहे. एका प्रकल्पाचा फटका दुसऱ्याला बसू नये, यासाठी हे दोन विभाग करण्यात आले आहेत.

Web Title: Partition to save the benefits project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.