परूळेबाजारला केंद्रस्तरीय पुरस्कार

By admin | Published: July 10, 2014 12:15 AM2014-07-10T00:15:13+5:302014-07-10T00:19:07+5:30

पंचायत सशक्तीकरण अभियान : ८ लाख रूपयांचे पारितोषिक

Parule Bazar Central Level Award | परूळेबाजारला केंद्रस्तरीय पुरस्कार

परूळेबाजारला केंद्रस्तरीय पुरस्कार

Next

ओरोस : पंचायत सशक्तीकरण अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायतीला केंद्रस्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीला केंद्राकडून ८ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच केंद्रस्तरावरील राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीला ८ लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यामध्ये परुळेबाजार ग्रामपंचायतीला हा मान मिळाला आहे. परुळेबाजार ग्रामपंचायतीने केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केंद्रीय कमिटीने केली होती. या समितीत रिचा माथूर व वैशाली पाटील यांचा कमिटीत समावेश होता. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीला कोकण विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. त्यानंतर परुळेबाजारला केंद्रस्तरावर नामांकन मिळाले होते. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची पाहणी केली पूर्ण गावाला भेट देऊन बायोगॅस, गांडूळखत, वृक्ष लागवड, गुरांची निगा, पर्यावरण संतुलन, वनराई बंधारे, म.ग्रा.रो.ह. योजना यांची पाहणी केली होती व आपला अहवाल केंद्राला सादर केला.
ग्रामपंचायतीने विविध विकासकामात आघाडी घेत जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. या सर्व आघाडीवर यशस्वी कामगिरी करण्यासाठी ग्रामपंचायतीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, विस्तार अधिकारी बी. आर. वायंगणकर, संजय गोसावी (कृषी), उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व विभागांचे कर्मचारी, ग्रामसेवक मंगेश नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ यांचे विशेष योगदान व सहकार्य दिले आहे. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायतीने केंद्रस्तरावरील पुरस्कार मिळविण्याचा मान परुळेबाजार ग्रामपंचायतीने मिळविला आहे.
नीलेश सावंत, माजी सभापती सुनिल म्हापणकर यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे. सरपंच प्रदीप प्रभू यांनीही सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे यश मिळाल्याचे मत व्यक्त केले. लवकरच दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव होणार आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Parule Bazar Central Level Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.